मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यावर आता पडदा पडल्याचं सांगितलं जात आहे. कारण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांच्या फेऱ्या मारल्यानंतर आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत जवळपास 1 तास चर्चा झाली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा सुसंवाद सुरु झाल्याचं आता बोललं जात आहे. तर दुसरीकडे पवार आणि ठाकरे यांच्या बैठकीत तीन महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. (Meeting between CM Uddhav Thackeray and Sharad Pawar, discussion on 3 issues)
महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे होत आली असली तरी अद्याप महामंडळांचं वाटप झालेलं नाही. महामंडळाचं वाटप करुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना दिलासा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या आजच्या भेटीत महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र कोरोना निर्बंधांबाबत अन्य राज्यांतील स्थितीचा आणि निर्णयाचा आढावा घेतला पाहिजे. सततच्या निर्बंधांमुळे सर्वसामान्य जनतेत आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याचबरोबर राज्याची आर्थिक घडीही विस्कटत आहे. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय.
पावसाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसनं केलीय. तसंच विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल असा दावाही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन राज्य सरकारवर सातत्याने हल्ला सुरु ठेवलाय. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता फार चालढकल करु नये. महाविकास आघाडी निवडणूक जिंकेल. त्याबाबत चिंता नको, अशी चर्चाही या बैठकीत झाली असल्याचं कळतंय.
मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित होते. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. त्याचदरम्यान राष्ट्रवादीचे दिग्गज नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर तासाभराने म्हणजे संध्याकाळी 4 च्या सुमारास स्वत: शरद पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले.
संबंधित बातम्या :
शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना व्हिप जारी
शरद पवार तब्बल अडीच तासांनी वर्षा बंगल्यावरुन निघाले, 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा!
Meeting between CM Uddhav Thackeray and Sharad Pawar, discussion on 3 issues