Abhishek ghosalkar | अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरेंकडून मोठा संशय व्यक्त

| Updated on: Feb 10, 2024 | 1:11 PM

Abhishek ghosalkar | अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केलेत. त्यांनी एक मोठा संशय व्यक्त केलाय. "आता सरकारमध्ये गँगवॉर आलय. गुंडांना संरक्षण मिळणं हा चिंतेचा विषय आहे" असं उद्धव ठाकरे म्हणाले

Abhishek ghosalkar | अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरेंकडून मोठा संशय व्यक्त
uddhav thackeray on abhishek ghosalkar death
Follow us on

मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे. ते ठाकरे गटाचे प्रमुख आहेत. अभिषेक घोसाळकरची गुरुवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा सगळा प्रकारच धक्कादायक होता. फेसबुक लाइव्ह दरम्यान ही हत्या झाली. मॉरिस नावाच्या स्थानिक गुंडाने अभिषेक घोसाळकरची हत्या केली. मॉरिसवर बलात्काराचा गंभीर गुन्हा होता. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केले आहेत. “डोळ्यासमोर बेबंदशाही सुरु आहे. महाराष्ट्राची जनता कमालीची दुखावली गेलीय. गेल्या काही दिवसांपासून गुंडांचा हैदोस महाराष्ट्रात सुरु आहे. असा हैदोस असं नाही की यापूर्वी झाला नव्हता. ते गँगवॉर दोन गँगमधलं होतं. पण आता गँगवॉर सरकारमध्ये आलय. गुंडांचे मंत्र्यांसोबतचे फोटो वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता सरकारमध्ये गँगवॉर आलय. गुंडांना संरक्षण मिळणं हा चिंतेचा विषय आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “अभिषेकची निर्घृण हत्या झाली, ज्याने हत्या केली तो एक गुंड होता. त्या गुंडाने सुद्धा आत्महत्या केली” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “हे प्रकरण वरकरणी जेवढ वाटतं, तेवढ सोप नाहीय. सूड भावनेतून टोकाच पाऊल उचलण्यात आलं. त्या गुंडाने स्वत: आत्महत्या का केली? हा प्रश्न उरतोच” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मॉरिसने बॉडीगार्ड का ठेवलेला?

अभिषेक आणि मॉरिस यांच फेसबुक लाइव्ह सुरु होतं. त्या दरम्यान ही हत्या झाली. “अभिषेकला गोळ्या लागल्या ते दिसतय पण कोण या गोळ्या झाडतय ते दिसत नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मॉरिसकडे परवानाधारक शस्त्र नव्हत. त्याने त्याचा बॉडीगार्ड मिश्राच शस्त्र वापरलं. त्याने बॉडीगार्ड का ठेवलेला? ती वेळ का आली?” असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलेत. “अभिषेकवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की, आणखी कोणी चालवल्या? दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती का?” असा गंभीर प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलाय.