विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने निर्णयांचा सपाटा लावला आहे. महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपासंदर्भातील बोलणी प्राथमिक स्तरावर आहेत. अजून कोण कुठल्या जागेवर लढणार ते जाहीर झालेलं नाही. जागावाटपाचा तिढा सोडवणं हेच दोन्ही आघाड्यांसमोरील मुख्य आव्हान आहे.
महायुतीत नाशिक जिल्ह्याच्या जागावाटपावरुन मतभेद होऊ शकतात. नाशिक जिल्ह्यात महायुतीत शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ राहणार का ? असा प्रश्न विचारला जातोय. नाशिकमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या जागेवरही शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. नाशिक मध्य, नाशिक पश्चिममध्ये भाजपचे तर देवळाली आणि दिंडोरीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
जास्त जागा मिळविण्यासाठी रस्सीखेच
मालेगाव बाह्य, नांदगाव, देवळाली, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम या जागांवर दावा करण्यात आला आहे. जागावाटप होण्यापूर्वीच महायुतीत जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. नाशिकमधील 15 पैकी 7 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केल्यानं मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिकचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.