सिंधुदुर्ग : संपूर्ण कोकणाचं लक्ष आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा सत्र न्यायालयाकडे लागलं होतं. नितेश राणेंना (BJP MLA Nitesh Rane) अटक पूर्व जामीन मिळणार का, असा याकडे संपूर्ण महाराष्ट्राची बारीक नजर लागून राहिली होती. मात्र दिवस संपला तरिही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. कोर्टाची वेळ संपल्याकारणानं आजचा युक्तीवाद थांबवण्यात आला. सराकरी वकील विरुद्ध नितेश राणेंचे वकील यांच्यात जामीन देण्या- न देण्यावरुन घमासान पाहायला मिळालं. दरम्यान, महत्त्वाची गोष्ट म्हणजे नितेश राणेंना अंतरीम जामीन (Bail) देण्याची करण्यात आलेली विनंती मान्य झालेली नसल्याची माहिती समोर येते आहे. अंतरीम जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला असून आता उद्या पुन्हा अटकपूर्व जामीनावर सुनावणी करण्यात येणार आहे.
सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली. त्यानी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –
- विधानभवनाच्या पायऱ्यावंर कोण कसल्या प्राण्याचा आवाज काढतो, याचा इथे काय संबंध? पोलिसांविरोधात तक्रार नसल्याचं सांगता मग पोलिसांवर दबाव आहे असं का बोलता?
- पोलिसांवरुन तुमच्या दोन वेगवेगळ्या भूमिका का? दखलपात्र गुन्हा असेल, तर तक्रार लगेच झाली पाहिजेच.
- सातपुते हा स्वाभिमानीचा कार्यकर्ता होता, नंतर त्यानं भाजपात प्रवेश केला होता.
- आरोपी सर्व लोकांसमोर चाकूनं हल्ला करतात. मग नितेश राणे, गोट्या सावंत यांना फोनवरुन हल्ला केल्याचं सांगू शकत नाही का? आमच्या मागे मोठे हात आहेत, असं आरोपींना सुचवायचं नसेल कशावरुन?
नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी कोर्टात युक्तीवाद करत अंतरीम जामिनाची विनंती केली होती. त्यांनी आपल्या युक्तीवाद करताना मांडलेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –
- कुठलंही सर्च वॉरंट नसताना राणेंच्या रुग्णालयात झडती का घेतली?
- नितेश राणेंना काल दिलेली नोटीस चुकीची असून सरकार पोलिसांवर दबाव टाकतंय.
- फिर्यादीचा सत्कार अजित पवारांकडून कसा केला गेला?
- हल्ल्यातील संशयितांची नावं गुप्त ठेवली जातात, मग नितेश राणे, गोट्या सावंत यांना नाटीस बजावल्याचं तपास अधिकाऱ्यांनी मीडियाला का सांगितलं?
- राग मनात ठेवून नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न झाला. नितेश राणे आणि आरोपी सचित सातपुतेचा सीडीआर पोलिसांनी मिळालाय. राजकीय प्रतिष्ठेसाठी नितेश राणेंना अडकवलं जातंय.
उद्या, टू बी कंटिन्यू…
दरम्यान, आज सुनावणीवेळी कोर्टाची वेळ संपल्यानं युक्तिवाद थांबवण्यात आला. आजचा युक्तिवाद आता उद्या पुन्हा सुरु केला जाईल. यानंतर सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील युक्तिवाद करतील. या सुनावणी नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप आमदार नितेश राणे हे अजूनही नॉट रिचेबलच आहेत. ते केव्हा समोर येणार, हे पाहणंही महत्त्वाचंय.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप आमदार नितेश राणे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. भाजपचे आमदार नितेश राणे यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. त्यानंतर आता रविवारपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यानं ते अज्ञातवासात गेल्याचं सांगितलं जातंय. आता त्यांच्या जामीनाबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.