मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचं (IT raid) धाडसत्र सुरु आहे. आयकर विभागाकडून अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कार्यालयावर छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील बहिणींवरही छापा टाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय.
अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे. अजित पवारांच्या 3 बहिणींमध्ये कोल्हापुरातील विजया पाटील, तर पुण्यातील नीता पाटील आणि रजनी इंदूलकर यांचा समावेश आहे.
सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झालं. इथेही तीन दिवसांपासून आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे.
तिसऱ्या दिवशीही ‘दौंड शुगर’ या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाकडून तपासणी सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून कसून तपासणी.
अजित पवारांच्या बहिणी डॉ. रजनी इंदुलकर यांच्यासह नीता पाटील यांच्या घरीही सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मोदीबागेत नीता पाटील यांचे घर आहे. याच इमारतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राहतात.
अजित पवारांच्या 3 बहिणींबरोबरच, 4 साखर कारखान्यांतील कागदपत्रांची छाननी आयकर विभागाकडून केली जातेय. यात साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखाना, नंदुरबारमधला पुष्पदंतेश्वर साखर कारखाना, अहमदनगरमधला अंबालिका, तर पुण्यातील दौंड शुगर साखर कारखान्याचा समावेश आहे. आयकर विभागाची पहिली नजर अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावरच पडली. सलग दुसऱ्या दिवशी आयकरच्या अधिकाऱ्यांकडून जरंडेश्वर कारखान्यात कारवाई सुरु आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सायंकाळी चार वाजता ते औरंगाबादेत दाखल होतील. अजित पवार एक दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असतील. ते विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात जवळपास दीड तास आढावा बैठकीचं नियोजन आहे.
संबंधित बातम्या