पंकज भनारकर, Tv9 मराठी, मुंबई | 4 डिसेंबर 2023 : 2024च्या लोकसभेसाठी, ‘मोदी गॅरंटी’ असंच कॅम्पेनचं सुरु झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आता गॅरंटीचं दुसरं नाव, मोदी असल्याचं वाटतंय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत भाजपनं मोठा विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साडे 4 महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा शंखनादही केला. 2024 मध्ये मोदी विरुद्ध देशभरातल्या विरोधकांची इंडिया आघाडी असा थेट सामना होणार आहे. NDAचे नेतृत्व मोदीच करत आहेत. तर इंडिया आघाडीची कमान काँग्रेसच्या हाती आहे. मात्र इंडिया आघाडीवर मोदींनी हल्लाबोल केलाय.
इंडिया आघाडीचा फोटो चांगला निघू शकतो, पण जनतेचा विश्वास जिंकणार नाही, अशा शब्दात मोदींनी निशाणा साधलाय. मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीत 26 पक्ष एकत्रित आले आहेत. देशभरातल्या 17 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष अर्थात NDAचं सरकार आहे. ज्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, उत्तराखंड, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश अशा 11 राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, हरियाणा, सिक्कीम, मेघालय, नागालँड, पुदुच्चेरीत मित्रपक्षांसोबत भाजप सत्तेत आहे. या एकूण 17 राज्यांमध्ये लोकसभेच्या तब्बल 261 जागा आहेत.
विरोधकांचा विचार केला तर, काँग्रेस कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणात सत्तेत आहे. इंडिया आघाडीची सरकारं असलेली राज्य म्हणजे, पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, बिहार, झारखंड, तामिळनाडू, केरळचा समावेश आहे. म्हणजेच इंडिया आघाडीची सत्ता 10 राज्यांत आहे. इथं लोकसभेच्या 229 जागा आहेत. आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस आणि ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दल एनडीए आणि इंडिया दोन्ही आघाडीत नाही. तर 3 राज्यातल्या विजयानंतर मोदींनी विरोधकांना आपल्या स्टाईलनं कडक इशाराही दिलाय.
इकडे महाराष्ट्रात खासदार संजय राऊतांनी मोदी मॅजिक नाही तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मॅजिक चालणार असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनीही उडी घेतली असून माझाच ताशा जोरात वाजणार असल्याचं म्हटलंय. 2024 साठी भाजप आणि पंतप्रधान मोदींनी कंबर कसलीय. त्यातच नुकतेच विधानसभेचे आलेले निकाल विरोधकांसाठी टेंशन वाढवणारे आहेत.