नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या हिंसेवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले होते. मणिपूरमध्ये तुम्ही भारतमातेची हत्या केली आहे. भारत एक आवाज आहे. भारत आपल्या जनतेची आवाज आहे. हृदयातून येणारी आवाज आहे. त्या आवाजाची हत्या मणिपूरमध्ये करण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्ही भारत मातेची हत्या मणिपूरमध्ये केली आहे. तुम्ही मणिपूरमध्ये लोकांना मारून भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी नाही. त्यामुळेच तुम्ही मणिपूरला जात नाही. कारण हिंदुस्थानची हत्या केली आहे. भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे संरक्षक नाहीत. तुम्ही तर भारत मातेचे हत्यारे आहात, असा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी बोलत असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी त्यांना मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आदराने बोला असं ओम बिरला वारंवार सांगत होते. त्यावेळी सभागृहात एकच गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाला आक्षेप घेताच विरोधकांनीही भाजपला धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.
ओम बिरला यांनी रोखण्याचा प्रयत्न करताच राहुल गांधी म्हणाले, मी माझ्या आईच्या हत्येवर बोलत आहे. मी आदरानेच बोलत आहे. भारताचे सैन्य एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता निर्माण करू शकते. पण त्यांचा वापर झाला नाही. कारण मणिपूरमध्ये भारतमातेला मारायचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मनाचं ऐकत नाही तर कुणाचं ऐकत आहेत? फक्त दोनच लोकांचं ते ऐकत असतात, असं राहुल गांधी म्हणाले.
रावण केवळ दोन लोकांचं ऐकत होता. एक मेघनाथ आणि दुसरा कुंभकर्ण. त्याचप्रमाणे मोदी दोघांचं ऐकत आहे. एक म्हणजे अमित शाह आणि दुसरे म्हणजे अदानी. लंकेला हनुमानाने आग लावली नाही. अहंकाराने लंकेला जाळलं होतं. रामाने रावणाला मारलं नाही. अहंकाराने रावणाला मारलं. तुम्ही संपूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. तुम्ही हरियाणाला जाळत आहात. तुम्ही संपूर्ण देशाला जाळण्याचं काम करत आहात, असा हल्लाही त्यांनी चढवला.
मी काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान गेले नाही. कारण त्यांच्यासाठी मणिपूर म्हणजे भारत नाही. मणिपूरचं वास्तव म्हणजे मणिपूर वाचला नाही. मणिपूर दोन भागात विभागला गेला आहे. मणिपूरचे तुकडे करण्यात आले आहे. मी मदत शिबिरात गेलो. महिलांशी चर्चा केली. तुमच्यासोबत काय झालं?, असं मी त्या महिलांना विचारलं.
त्यावर ती म्हणाली, माझा एक छोटा मुलगा… एकच मुलगा होता मला. त्याला माझ्या डोळ्यासमोर गोळी घालून मारण्यात आलं. मी संपूर्ण रात्रभर त्याच्या मृतदेहा शेजारी बसून होते. नंतर मला भीती वाटली. मी घर सोडलं, असं ती महिला म्हणाली. मी म्हटलं तुम्ही काही तरी सोबत आणलं असेल. तिच्याकडे फक्त कपडे आणि एक फोटो होता. तो तिने दाखवला. आणि म्हणाली, माझ्याकडे एवढंच आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
दुसऱ्या कँम्पमधील एक महिलाही माझ्याकडे आली. मी तिला विचारलं तुमच्यासोबत काय झालं? मी तिला हा प्रश्न विचारताच ती हादरली. थरथरू लागली. तिला तिच्यासोबत घडलेलं दृष्य आठवलं आणि ती बेशुद्ध पडली. माझ्यासमोरच बेशुद्ध झाली. मी फक्त दोनच उदाहरण दिली आहेत. तुम्ही मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली. मणिपूरमध्ये हिंदुस्थानला मारलं. हिंदुस्थानची हत्या झालीय. मर्डर झालीय, असंही ते म्हणाले.