मुंबई : आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळा प्रकरणात भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) गायब आहेत. मात्र, आज जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर ते पहिल्यांदाच सोशल मीडियावर समोर आले. या घोटाळा प्रकरणात आपण उच्च न्यायालयात जाणार असून तिथे आपली बाजू मांडणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. इतकंच नाबी तर नुसते हवेतील आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण गोष्टी कोर्टासमोर मांडणार असल्याचं सांगतानाच ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. सोमय्या यांच्यावरील आरोपांबाबत आता भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. किरीट सोमय्या हे पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील, असं दरेकर म्हणाले.
प्रवीण दरेकर यांना मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय. त्यानंतर दरेकर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना किरीट सोमय्या यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दरेकर म्हणाले की, ‘किरीट सोमय्या हा एक धाडसी नेता आहे. आपण बघाल तर तो कशाचीही पर्वा न करता, राज्यात जे जे घोटाळे झाले ते महाराष्ट्रासमोर आणले आहेत. इतकंच नाही तर भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होण्यापर्यंत त्यांनी पुरावेसुद्धा दिलेले आहेत. ज्यावेळेला आपण इतरांवर आरोप करतो तेव्हा आपल्याला पळायचं काही कारण नाही. किरीट सोमय्या कुठेही पळून जाणार नाहीत. किरीट सोमय्या पोलीस चौकशीला निश्चितपणे सामोरे जातील. हा मला पूर्ण विश्वास आहे. ते काही पळपुटं नेतृत्व नाही’.
सोमवारी कोर्टाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्या पत्नीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले नव्हते. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यातच या प्रकरणावर एकाही भाजप नेत्याने प्रतिक्रिया न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. त्यानंतर आज सोमय्या यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने विक्रांत 60 कोटीला भंगारवाल्यांना विकण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने त्याचा निषेध नोंदवला होता. 10 डिसेंबर 2013 रोजी आम्ही फक्त एक प्रतिकात्मक निधी जमवण्याचा कार्यक्रम घेतला. केवळ 11 हजार रुपये जमवले होते. आज दहा वर्षानंतर राऊत म्हणतात, सोमय्यांनी 58 कोटी रुपये जमा केले. चार बिल्डरशी मनी लॉन्ड्रिंग करून आपल्या मुलाच्या कंपनीत वळवले. या पूर्वी राऊतांनी दोन महिन्यात सात आरोप केले. एकाचाही पुरावा दिला नाही. पोलिसांकडे एकही कागद नाही. केवळ राऊतांच्या स्टेटमेंटवरून तक्रार केल्याचं तक्रारदार म्हणतोय, असं सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्या यांना कोर्टाने आज दुसरा झटका दिला आहे. काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आज किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आयएनएस विक्रांत केस प्रकरणात सोमय्या पिता पुत्राच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
इतर बातम्या :