नवी दिल्ली : शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदी अरविंद सावंत यांना संधी देण्यात आली आहे. अरविंद सावंत हे संध्याकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मंत्रिपदाची शपथ घेतील. शिवसेनेत मंत्रिपदासाठी आणखी मोठे दावेदार असातना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. मात्र, अरविंद सावंत यांच्या नावामुळे शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.
दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना मंत्रिपद दिल्यामुळे शिवसेनेत दोन गट तयार झाले असून, ग्रामीण विरुद्ध शहरी भागातील खासदार अशी गटबाजी निर्माण झाली आहे. शहरी भागातील खासदाराला संधी दिल्यामुळे ग्रामीण भागातील खासदार नाराज आहेत.
वाचा : क्लास टीचर ते केंद्रीय मंत्री, अरविंद सावंत यांची धगधगती कारकीर्द
शिवसेनेते सहावेळा खासदार झालेल्या यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी, बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा ज्येष्ठतेप्रमाणे केंद्रीय मंत्रिपदावर दावा होता. शिवाय, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती.
अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून 2014 आणि 2019 असे सलग दोनवेळा निवडून आले आहेत. दोन्ही वेळा त्यांनी काँग्रेसची माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांचा पराभव केला. पक्षनिष्ठ शिवसैनिक म्हणून अरविंद सावंत यांची ओळख आहे. केवळ दोनवेळा खासदार म्हणून विजयी झालेल्या अरविंद सावंत यांच्या गळ्यात उद्धव ठाकरे यांनी थेट मंत्रिपदाची माळ घातली आहे.
कोण आहेत अरविंद सावंत?
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवेसेनेच्या अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मिलिंद देवरा सलग दोन वेळा 2004 आणि 2009 मध्ये निवडून आले. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करुन शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले.
त्यांतर यंदा म्हणजे 2019 साली पुन्हा एकदा अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईतून काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला.