देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्याने राष्ट्रवादीचे सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. कालपासूनच भुजबळ यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. भुजबळ यांच्या समर्थकांनी तर नाशिकमध्ये हिंसक आंदोलनही केलं आहे. तर भुजबळांचा वापर केवळ ओबीसी मते मिळवण्यापुरता झाल्याचा आरोप अनेक ओबीसी नेत्यांनी केला आहे. छगन भुजबळ यांनी आजही या सर्व प्रकरणावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. जहां नहीं चैना वहां नहीं… असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत. भुजबळ यांनी नागपूर अधिवेशनात न थांबण्याचाही निर्णय घेतला असून दुखावलेले भुजबळ नाशिकला जाणार आहेत.
छगन भुजबळ यांना मंत्रिपद डावलल्याने ते प्रचंड नाराज आहेत. आज मीडियाशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. तुम्ही अधिवेशनात थांबणार नाही का? तुमची आता पुढची काय भूमिका आहे? असे सवाल छगन भुजबळ यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपल्या स्टाईलने एकाच वाक्यात उत्तर दिलं. आता बघू, जहां नहीं चैना वहां नहीं… असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोठं सूचक विधान केलं आहे. छगन भुजबळ यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. भुजबळ हे अजितदादांची साथ सोडणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. तसेच भुजबळ पुन्हा शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याच्याही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भुजबळ आगामी दिवसात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्षल लागलं आहे.
मंत्रिपदाबाबत माझ्या नावाची चर्चा होती. पण ऐनवेळी माझं नाव का काढलं मला माहीत नाही. 7-8 दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर पाठवण्याचं प्रपोजल पक्षाकडून दिलं होतं. पण मी हा प्रस्ताव नाकारला. कारण मला राज्यसभेवर जायचं नाही. मागच्यावेळी मी म्हणालो होतो. तेव्हा ते ठिक होतं. पण मी आताच निवडून आल्याने लगेच राज्यसभेवर जाणं मला मान्य नाही. कारण मी आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी तो विश्वासघात ठरेल. माझे मतदार रागावणार नाहीत. पण त्यांच्याशी मी प्रतारणा करू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी ठणकावलं.
मला त्यांनी बक्षिस दिलं आहे. कसलं बक्षिस दिलं हे माहीत नाही. पण तुम्ही विचारता त्यावर मी एका एका वाक्यात बोलत आहे. जे काही होईल ते अपेक्षित नव्हतं. मला वाटलंही नव्हतं. पण ठिक आहे. मी त्यांचा राज्यसभेचा प्रस्ताव नाकारला आहे. आता मी थेट नाशिकला जाणार आहे. माझ्या लोकांशी चर्चा करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.