नवी दिल्ली : शेतकरी, आदिवासी, कामगार आणि शोषित-वंचितांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारे माकप आमदार जे. पी. गावित यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (मार्क्सवादी) लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आमदार जे. पी. गावित माकपचे उमेदवार असतील. माकपकडून लोकसभेसाठी देशातील 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या पहिल्या यादीतच महाराष्ट्रातील जे. पी. गावित यांचं नाव आहे.
माकपचे राज्यातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेले जीवा पांडू गावित अर्थात जे. पी. गावित हे कळवण मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. शेतकरी, आदिवासी, कामगार आणि शोषित-वंचितांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारे नेते आणि अडीअडचणींना धावून येणारा आमदार म्हणून जे. पी. गावित यांची ओळख आहे. शेतकरी, आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी मुंबईवर धडकलेल्या मोर्चाचे नेतेही जे. पी. गावितच होते. दिंडोरीसह अजूबाजूच्या परिसरात जे. पी. गावित यांचं काम असल्याने, माकपने त्यांना उमेदवारी जाहीर केल्याने इतर पक्षांची धाकधूकही वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरीतून माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे सुपुत्र धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, जे. पी. गावित यांना माकपने उमेदवारी दिल्याने महाले यांचा विजय आव्हानात्मक होणार आहे. त्यात शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. एकंदरीत दिंडोरीची लढत अत्यंत रोमांचक होईल, हे निश्चित.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.