जळगाव : जळगाव महापालिकेत सध्या अनोख्या राजकारणाचं दर्शन बघायला मिळतंय. महापालिकेवर सध्या महाविकास आघाडी पूरस्कृत शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेच्या महापौर या शिवसेनेच्या जयश्री महाजन या आहेत. तर त्यांचे पती सुनील महाजन हे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. विशेष म्हणजे दोघं शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. आताही ते शिवसेनेतच आहेत. पण पत्नी शिवसेनेची महापौर तर पती शिवसेनेचाच विरोधी पक्षनेता आहे (Jalgaon Politics Jayshree Mahajan is mayor and his husband opposition leader).
नेमकं कारण काय?
जळगाव महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाल. शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. त्यानंतर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी विराजमान झाल्या. त्यावेळी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होते. महाजन यांचे पती सुनील महाजन विरोधी पक्ष नेते होते ते आजही आहेत. त्यामुळे एकाच घरात महापालिकेतील महापौर आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदे आहेत.
महापौर निवडणुकीत भाजपचे आमदार फुटले
जळगाव महापालिकेत 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 75 जागांपैकी भाजपला 57 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला 15 आणि एमआयएम पक्षाला तीन जागा मिळाल्या. त्यामुळे भाजप सत्ताधारी तर शिवसेना विरोधी पक्ष होता. अडीच वर्षांनी महिला राखीव असलेल्या महापौर पदासाठी निवडणूक लागली अन याच ठिकाणी मोठे उलटफेर झाले. भाजपचे तब्बल 30 नगरसेवक फुटले. तर एमआयएमनेही सेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेनेकडे सत्ता आली.
भाजपकडून अद्याप विरोधी पक्षनेते पदाचा दावा नाही
शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी महापौर झाल्या. तर शिवसेनेकडे तांत्रिकरित्या विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे सुनील महाजन हेच विरोधी पक्षनेते आहेत. सत्तांतर झाल्यानंतर जळगाव महापालिकेची पहिली महासभा ऑनलाईन उद्या होत आहे. पत्नी महापौर जयश्री महाजन व्यासपीठावर असतील तर पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते असतील. भारतीय जनता पक्षाने आद्यापही विरोधी पक्षनेते पदाचा दावा केलेला नाही.