जळगावः राज्यभरातील ज्या ज्या ठिकाणी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी संघटनात्मक फेर रचनेवर भर दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) हे एकाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात शामिल झाले आहेत. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वातील शिवसेनेनं त्यांना मोठा धक्का दिला आहे. पाटील यांच्या मतदार संघात नवी नेमणूक केल्याने आमदार पाटील यांची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या सर्वच आमदार तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी करून शिवसेना पक्षप्रमुखांनाच आव्हान दिलंय. मात्र आता उद्धव ठाकरेंनी बंडखोरांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
बंडखोरांच्या गटात सहभागी झाल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडून शिवसेना जिल्हा प्रमुख पद काढून घेण्यात आलंय. त्यांच्या जागी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांसह बहुतांश पदाधिकार्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात आलेले संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आता पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. येथे नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची धुरा आता माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्याकडे देण्यात आली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेल्या दीपकसिंग राजपूत यांच्याकडे जामनेर, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेल्या या फेरबदलामुळे आता चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर इतर पदाधिकाऱ्यांच्या गटातही खळबळ माजली आहे. आगामी काळात शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
गेल्या 15 वर्षापासून मी जिल्हा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो. ज्यांनी माझ्या जागी दुसऱ्याला दिले त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णयाचे मी स्वागत करतो. मी शिंदे सरकारच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. जरी मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख नसलो, तरी आमदार आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.