जालनाः संजय राऊतांना (Sanjay Raut) गद्दारांची यादी करायची असेल तर त्यांनी आधी त्यांचेच मंत्री अब्दुल सत्तारांचं नाव घ्यावं, असा सल्ला भाजपचे जालन्याचे आमदार संतोष दानवे यांनी दिला आहे. मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला विजयी करण्यासाठी खूप मदत केली. अनेक अपक्ष आमदारांना आमच्या बाजूने वळवले, त्यांच्यामुळेच हा विजय संपादन करू शकलो, असा गंभीर आरोप संतोष दानवे (Santosh Danve) यांनी केलाय. निवडणुकीच्या मतदानापूर्वी शिवसेना नेते आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी संतोष दानवेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं होतं. जालन्यातल्या भोकरदनचे आमदार संतोष दानवेदेखील आमच्या बाजूने मतदान करणार असल्याचं भाकित त्यांनी केलं होतं.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाचा विजय झाला, यावर प्रतिक्रिया देताना संतोष दानवे म्हणाले, ‘राज्यसभेची निवडणूक हा नंबर गेम नव्हता तर टेक्निकल इलेक्शन होतं. यात विजयासाठी लागणारे सगळे पर्याय खेळले गेले. अब्दुल सत्तार ज्या पक्षात आहेत, ते कधीच त्या पक्षात नसतात. म्हणून अपक्ष मतदारांना आमच्यासोबत घेण्यासाठी सत्तारांनी जी आम्हाला मदत केली, त्यांचे आभार मी व्यक्त करतो. ते ज्या पक्षात असतात, ते कधीच तिथे नसतात, हे त्यांनी परत एकदा दाखवून दिलं. ‘
अब्दुल सत्तारांनी संतोष दानवेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर उपहासात्मक प्रतिक्रिया देताना संतोष दानवे म्हणाले, ‘ सत्तारांनी आम्हाला १०० टक्के मतं दिली. ते नेहमी बाजारात फिरतात. कोण कुठं गेलंय, कोण कुठं चाललंय, याची सगळी माहिती त्यांना असते. अशा बडबडीने नेहमीच पक्षाला मिळते. हीच मदत आम्हाला कामी आली. विधान परिषदेतही ते आम्हाला अशीच मदत करतील’
अपक्ष मतदार-आमदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. पराभव दिसल्यानंतर संजय राऊतांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. जर खरच गद्दारांची यादी त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आधी त्यांच्याच मंत्र्याचं म्हणजे अब्दुल सत्तारांचं नाव घ्यावं.’ असा सल्ला संतोष दानवे यांनी राऊतांना दिला आहे.