सांगली : इस्लामपूर येथील जायंट्स ग्रुपने आयोजित केलेली ‘सायकल रॅली’ सध्या सांगलीसह राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. या चर्चेला कारणही तसेच आहे. माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी या रॅलीनिमित्त एकत्रित सायकलावारी केली. कधी विरोधात, तर कधी सोबत राहणाऱ्या या दोन नेत्यांना एकत्रित सायकलवारी करताना पाहण्यासाठी इस्लामपुरात लोकांचीही मोठी गर्दी जमली होती. शिवाय, सायकलवारीत सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला होता.
उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम अत्यावश्यक आहे. आणि सायकलिंग हामाझा आवडता व्यायाम प्रकार. परीवर्तन वर्षाच्या पहिल्या दिवशी इस्लामपूर येथे जायंट्स आॅफ इस्लामपूर आणि सकाळ उद्योगसमुह यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘जागतिक सायकल दिना’ निमित्तआयोजित सायकल रॅलीचे नेतृत्व करीत सहभागीझालो. pic.twitter.com/eMRtr2I7VB
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 1, 2019
सांगलीतील इस्लामपूर म्हणजे जयंत पाटील यांचं होमग्राऊंड. इथे जयंत पाटील यांचे कायमच वर्चस्व राहिले आहे. मात्र, लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात येणारा हा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी हे गेल्या दोनवेळा खासदार म्हणून निवडून येत आहेत. ही राजकीय रचना पाहता, जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांची एकी आगामी निवडणुकांसाठी इतरांना भारी पडू शकते, हे स्पष्ट आहे.
खासदार राजू शेट्टी यांचा मतदार हा प्रामुख्याने शेतकरी वर्गातील अधिक आहे. येत्या निवडणुकांमध्ये राजू शेट्टी आघाडीच्या गोटात समील झाले, तर पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला मोठा फायदा होईल, हे निश्चित. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्यासारख्या संभाव्य आघाडीतील मोठ्या नेत्यासोबत राजू शेट्टी यांचं सख्य जमल्याने आगामी काळात नवी आणि मजबूत समीकरणं सांगली, कोल्हापूर आणि एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्या विरोधकांनाही या दोघांचे एकत्र येणे भारी पडणार, हेही निश्चित.
तूर्तास, जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांनी आता केवळ ‘सायकल रॅली’ पार पडली आहे. या रॅलीचं रुपांतर ‘प्रचार रॅली’त होऊन सायकलवरुन जसे सोबतीने फेरफटका मारला, तसाच निवडणुकीतही ‘सोबत’ कायम राखतील का, याची उत्सुकता इस्लामपूर-सांगलीसह राज्याला आहे.
पाहा व्हिडीओ :