मुंबई: परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना नाव न घेता सुनावले. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. गुजराती आणि राजस्थानी लोकांना वगळलं तर मुंबई (mumbai) आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक उदगार काढल्यानंतर ही महाराष्ट्रने संयम दाखवला होता. आता मात्र महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मराठी माणसांचा हात नाही अशा पद्धतीचे उदगार काढणं हे राज्यपाल महोदयांना शोभतं का?, असा सवाल त्यांनी केला.
नवं सरकार नव्या सरकारचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या झालेला या अपमानाचा जाब कसा विचारणार आणि त्याला कसे उत्तर देणार हे पाहावे लागेल. मुंबई ज्यांच्या जीवावर उभी राहिली त्या मराठी माणसांच्या कष्टावर राज्यपालांनी अशा पद्धतीने वक्तव्य करून शंका व्यक्त केलेय. महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान मा. राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्र भाजपाला हे विधान मान्य आहे का ? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार का अपमान करत आहेत ? असा सवालही त्यांनी केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. राज्यपाल हे राज्य आणि मुंबईचे पालक आहेत. त्यांचे वक्तव्य काळजीपूर्वक असायला हवे. भेद निर्माण करणारं वक्तव्य नसले पाहिजे. दुर्देवाने राज्यपाल यांनी कायमच असे वक्तव्य तसेच कृती केलीय. ती राज्याच्या हिताची कधीच राहिली नाही. गुजराती असो किंवा राजस्थानी बांधव तो जेव्हा महाराष्ट्रात आलाय तर तो महाराष्ट्रीयन झालाय. बंधु – भावाच वातावरण बिघडवण्याचे काम राज्यपालांनी करणं हे दुर्देवी आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे. राज्यपालांनी पुन्हा अशी गुस्ताखी करू नये. राज्यपालांना त्यांच्या राज्यात परत पाठवा, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. राज्यपाल वारंवार अशी विधानं करत आहेत. ही पुण्यभूमी आहे. या भूमीतील वातावरण गढूळ करू नये, असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.