संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगात आज शरद पवार यांच्या गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केल्याची माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षात कधीच वाद नव्हता. तसेच शरद पवार यांनी अध्यक्षपदाला स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचं समर्थन होतं. त्यामुळे या सुनावणीला काही अर्थ नाही. ते त्यांच्या स्वार्थासाठी सत्तेत सहभागी झाले आहेत, असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
अगोदरच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र संदर्भात युक्तिवाद केला होतो. शरद पवार यांनी अध्यक्ष होण्यासाठी कोणी प्रस्ताव दिला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी गटाने केला. इंदिरा गांधी आणि ब्रह्मानंद रेड्डी केसप्रमाणे निवडणूक आयोगाने पक्षातील वाद दिसायला हवा. दोन गटात वाद दिसायला हवा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा यांनी राजीनामा परत घ्यायला लावला, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा अजित पवार यांनी राजीनामा परत घ्यायला का लावला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
“ब्रम्हानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधी केसचा संदर्भ घेण्यात आला आहे. वाद हा अचानक होत नसतो. त्याला पार्श्वभूमी असते. मात्र इथे तसं नाही. 1999 नंतर आमचा पक्ष पुढे कसा गेला, याबाबत माहिती दिली. 2020 साली कोरोना होता म्हणून त्यावेळी पक्षात निवडणूक झाली नव्हती. त्यानंतर मात्र निवडणूक झाली”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“एका रात्रीत नवरा बायकोला सुद्धा घटस्फोट मिळत नाही. त्यासाठी देखील कलावधी जातो. मग इथ कसं शक्य आहे की एका दिवसांत यांचा वाद झाला? वाद हा पक्षाचा नाही तर सत्तेचा आहे. शरद पवार यांनी कष्टाने पक्ष निर्माण केला आहे. शरद पवारांनी रक्त आटवून पक्ष तयार केला. एखाद्या मुलाप्रमाणे संगोपन केलंय. मग वाद नेमका कुठे झाला. हा वाद पक्षाचा नाही तर सत्तेचा आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच “अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.