मुंबई | 27 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वसंत दादा पाटील यांचं सरकार पाडल्याची टीका केली. मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेत वसंतदादा पाटील यांना बाजूला केलं, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलेलं. पण आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे”, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना सुनावलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांनी ज्या प्रकरणावरुन शरद पवारांवर टीका केली त्यावेळच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
“शरद पवार जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते 38 वर्षांचे होते. पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद, या आघाडीची कल्पना ही समाजवादी नेते एस.एम. जोशी यांनी पुढे आणली. नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा होती. पण, त्या काळात दिल्लीच्या हायकमांडमध्ये नाशिकराव तिरपुडेंचा दबदबा होता. अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे, असे सर्वच पुरोगामी नेत्यांना वाटत होते. अन् यशवंतराव चव्हाणांनी मान हलवल्यानंतरच पुढील घडामोडी घडल्या. यामध्ये सर्वात मोठी भूमिका एस.एम. जोशी यांची असल्याकारणाने त्यांनी शरद पवार यांचे नाव सुचविले”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“त्यावेळेस असलेल्या जनता पार्टीची निर्मिती ही जयप्रकाश नारायण यांनी केली होती. अन् जनसंघ हादेखील जनता पार्टीत विलीन केला होता. जनसंघाचे अस्तित्व संपले होते आणि भारतीय जनता पार्टीची निर्मिती व्हायची होती. त्यामुळे कुठलाही जातीयवादी पक्ष हा पुलोदचा भाग नव्हता. अर्धवट माहितीच्या आधारे शरद पवारांवर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की शरद पवारांनी कधीच जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी केली नाही. कारण की, सन 1981 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्या आधीच पुलोदचे सरकार बरखास्त होऊन दुसरे सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे अजितदादांनी स्वतःची तुलना शरद पवारांच्या निर्णयाशी करावी, हे जरा हास्यास्पदच वाटतेय”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
“एवढ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री होणे आणि समान तत्वावर सरकार चालवणे, ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळेस उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील, एस .एम. जोशी, ना. ग. गोरे असे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या राजकारणात होते. स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे. त्यामुळे साहेबांनी ज्या वयात केले; त्या वयात तुम्हाला ते करताही आले नसते आणि त्यांनी जे केले ते तुम्हाला 63 व्या वर्षीही जमले नाही तुम्ही कितीही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तरी उजव्या मांडीवर कोण आणि डाव्या मांडीवर कोण, हे महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी माणसाला कळतंय”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.
साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते 38 वर्षांचे होते. पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद, या आघाडीची कल्पना ही समाजवादी नेते एस.एम. जोशी यांनी पुढे आणली. नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा होती. पण, त्या काळात…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 27, 2023
“आधी थोडीशी माहिती करून घेतली असती तर अशी गल्लत झाली नसती आणि या सर्व प्रकरणाला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची मान्यता होती. तेव्हा राजकारण म्हणजे साखर कारखाना; राजकारण म्हणजे बँका; राजकारण म्हणजे इथेनॉल फॅक्टरी ; राजकारण म्हणजे सहकारी उद्योग असे समीकरण नव्हते. तर महात्मा गांधीजींचा वारसा घेऊन चाललेले नेते हे समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे जात होते. हाच आजच्या आणि तेव्हाच्या राजकारणातला फरक आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी ठणकावून सांगितलं आहे.