MP Politics : 400 गाड्यांचा ताफा, शेकडो कार्यकर्ते आणि शिंदेच्या निकटवर्तीयाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

| Updated on: Jun 16, 2023 | 5:57 PM

विधानसभा निवडणुकीआधीच पक्षांतर सुरु झाले आहे. राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत.

MP Politics : 400 गाड्यांचा ताफा, शेकडो कार्यकर्ते आणि शिंदेच्या निकटवर्तीयाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Follow us on

भोपाळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. संधी मिळणार की नाही याचा अंदाज येताच नेते वेगवेगळ्या पक्षात जात असतात. आगामी विधानसभा निवडणुकीआधी आता राजकीय समीकरण बदलण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे बैजनाथ यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थिती त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झालीये. यादव यांनी २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण भाजप नेत्यांसोबत जमत नसल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसचा हात पकडला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्तकर्ते उपस्थित होते. जवळपास ४०० गाड्यांचा ताफा घेऊन ते काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

भाजपला येथे आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार आणि मंत्री अंखड प्रताप सिंह यांनी देखील आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे मध्यप्रदेशात निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आलाय. काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. कारण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुतम मिळाले होते. सरकार देखील स्थापन झालं होतं. पण २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं होतं.

भाजपसमोर आव्हान काय?

मध्यप्रदेशात भाजप पुढे नेत्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कर्नाटकात भाजपच्या पराभवानंतर इतर राज्यात निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी बैठका वाढल्या आहेत. राज्यातील बदलांपूर्वी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. पण नेत्यांना इतर पक्षात जाण्यापासून रोखण्याचं भाजपपुढे आव्हान असणार आहे.