ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सोमवारी मातोश्रीवर गेले होते. त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. “शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायच होतं. काल शिष्यांसह ते मातोश्रीवर आले. मातोश्रीवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हिंदू धर्मानुसार धार्मिक शिष्टाचारासह त्यांचं स्वागत करण्यात आलं” असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. “उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत विश्वासघात झाला. हिंदू धर्मात विश्वासातघात, फसवणुकीला थारा नाही. मुख्यमंत्रीपदावरुन विश्वासघाताने त्यांना दूर केलं. पक्ष फोडला, असं हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात. त्यामुळे काही जणांना पोटशूळ उठला असले, टिकाटिप्पणी केली असेल, याचा अर्थ त्यांना हिंदुत्व मान्य नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या भावना जनतेच्या भावना आहेत, शंकराचार्य यांना खोट ठरवणार असतील, तर मला आश्चर्य वाटणार नाही” असं संजय राऊत म्हणाले. “याच शंकराचार्यासमोर एका सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी झुकून नमस्कार केला. त्यांनी शकांराचार्यांचा आशिर्वाद घेतला” असं संजय राऊत म्हणाले.
शंकराचार्यांचा आशिर्वाद उद्धव ठाकरेंना
“न्यायालयात घटनाबाह्य सरकार विरोधात खटला सुरु आहे. आदरणीय शंकराचार्यांनी जो आशिर्वाद दिला, अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली, ती आमच्यासाठी मोठी आहे. शंकराचार्यांनी त्यांचं मन मोकळं केलं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली सेना त्याचं उद्धव ठाकरे नेतृत्व करतायत. त्याच शिवसेनेचा विश्वासघाताने तुकडा पाडला. हा हिंदुंचा विश्वासघात आहे. अशा प्रकारच्या भावना शंकराचार्यांनी व्यक्त केल्या. शंकराचार्यांचा आशिर्वाद महत्त्वाचा असतो, मातोश्रीवर येऊन शंकराचार्यांनी हा आशिर्वाद उद्धव ठाकरेंना दिला आहे. ” असं संजय राऊत म्हणाले.
जातीपातीच्या संघर्षामध्ये महाराष्ट्र अस्वस्थ
“महाराष्ट्र अस्वस्थ आहे. जातीपातीच्या संघर्षामध्ये महाराष्ट्र अस्वस्थ आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जे राजकारण पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. या राज्याचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळावं” असं संजय राऊत म्हणाले.