कागल विधानसभा मतदारसंघ हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हे राजकीय विद्यापीठ म्हणूनही ओळखलं जातं. कारण इथल्या नेत्यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर कागलचा राजकीय दबदबा निर्माण केला आहे. जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती, आमदारकी, खासदारकी.. निवडणूक कोणतीही असो कागलच्या नेते आणि कार्यकर्त्यांचा त्यात समावेश ठरलेलाच असतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातही कागल तालुका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. याच कागलची यंदाची विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचं दिसतंय. यामागचं कारण म्हणजे शरद पवारांनी कोल्हापूर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि तरुण नेते समरजितसिंह घाटगे यांच्या हाती तुतारी देऊन भाजपला दणका दिला आहे. खरंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मियालाल मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदासंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ते या पक्षात आहेत. मात्र राष्ट्रीवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडली. आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी कागलचा उमेदवार पक्का करून मुश्रीफ यांच्या अडचणी तर वाढवल्या आहेतच. पण समरजितसिंह यांच्या हाती तुतारी देऊन शरद पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांना शह दिला आहे. या कागलचं राजकारण कसं आहे ते जाणून घेऊयात..
कागलच्या राजकारणात हे चार गट स्पष्टपणे पहायला मिळतात. आपापली साखर कारखाने सांभाळून या प्रत्येक गटाने आपल्या बाजूने कार्यकर्त्यांची फौज उभारली आहे. यातील मंडलिक आणि घाटगे गटात पूर्वापार शत्रुत्व आहे.
कागलमधील घाटगे घराणं हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं जनक घराणं. या कुटुंबाने कायमच शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घराण्याचा मोठा मान आहे. या राजघराण्यातून राजकारणात उतरणारी पहिली व्यक्ती म्हणजे विक्रमसिंह घाटगे. 1978 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी कोणत्याही पक्षाचं पाठबळ त्यांना नव्हतं. तरीही शाहू साखर कारखाना उभारून आदर्श कारखाना म्हणून त्याची ओळख निर्माण केली. सध्या कागल विधानसभा मतदारसंघात चर्चेत असलेले समरजितसिंह घाटगे यांचेच सुपुत्र आहेत. शाहू साखर कारखान्यामुळे कागल आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात त्यांचा विशेष प्रभाव आहे.
सदाशिवराव मंडलिक यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदं अशी सगळी पदं जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत राहू लागले. सलग तीन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचेच शिष्य म्हणजे हसन मुश्रीफ.
कागल हा मतदारसंघ हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण इथून ते सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. हसन मुश्रीफसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून या पक्षात आहेत. मात्र अजत पवार यांच्या बंडानंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. एकेकाळी मुश्रीफ हे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. सुरुवातीपासूनच मुश्रीफ यांची ओळख एक चळवळ्या कार्यकर्ता म्हणून होती. जनतेसोबत कायम त्यांची नाळ जोडलेली असल्याचं पहायला मिळालं. मंडलिकांनीच मुश्रीफ यांच्यातील हा खास गुणधर्म हेरला आणि त्यांना हाताशी धरून निवडणुका जिंकल्या. यात मंडलिकांची खासदारकी आणि मुश्रीफांची आमदारकी अशी वाटणी झाली. परंतु पुढे जाऊन या दोघांमध्ये हमिदवाडा कारखान्यावरून वाद झाला. इथूनच हसन मुश्रीफ यांच्या नव्या गटाचा जन्म झाला. सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा मुलगा संजय मंडलिक यांना पुढे आणलं, तर शरद पवार यांनी मुश्रीफांना साथ दिली.
संजय बाबा घाटगे यांनी सात वेळा वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावर कागल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. 1998 ची निवडणूक वगळता नंतरच्या निवडणुकांमध्ये हसन मुश्रीफ यांनी त्यांचा थोड्याशा मतांच्या फरकाने पराभव केला. 2019 ची कागल विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. शिवसेनेकडून संजय घाटगे आणि अपक्ष उमेदवार म्हणून विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजितसिंह घाटगे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी समरजितसिंह यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु युतीत कागलची जागा शिवसेनेला सुटली. त्यामुळे घाटगेंनी अपक्ष निवडणूक लढवली. यात विरोधकांची मतं विभागली गेल्याचा मुश्रीफांना मोठा फायदा झाला. ते तीस हजारहून अधिक मतांनी जिंकून आले होते. या निवडणुकीत समरजितसिंग घाटगे यांना मिळालेली 88 हजार मतं लक्षवेधी ठरली. समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफांना कडवं आव्हान दिलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे महायुतीमधील कागल विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार हे स्पष्ट झालं. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाल्यानंतर ते नाराज झाले. म्हणूनच ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यातच शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार संजय घाटगे यांनी निवडणुकीआधीच तलवार म्यान केली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगे हे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील. कागलच्या आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झाली, तेव्हा ती मुश्रीफ यांच्यासाठी सोपी ठरली. मात्र दुरंगी लढतीत त्यांचा कस लागतो. हसन मुश्रीफ हे आपल्याला सोडून गेले ही गोष्ट राष्ट्रवादीच्या शरद पवार यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. लोकसभेतही त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयोग केला. त्याचा फायदासुद्धा त्यांना झाला. तसाच प्रयोग ते आता कागल विधानसभा मतदारसंघात करु इच्छित आहेत. समरजितसिंग घाटगे हे पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. उच्चशिक्षित आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून सर्वसामान्यांमध्ये त्यांचा मोठा नावलौकिक आहे. विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर झालेली शाहू कारखान्याची निवडणूक समरजितसिंह यांनी विक्रमी मतांनी जिंकली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे.
1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ हे सलग पाचव्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. त्यापैकी मुश्रीफ हे 1999 मध्ये 2881 मतांनी, 2004 मध्ये 1125 मतांनी आणि 2014 मध्ये 5934 मतांनी विजयी झाले. 2009 मध्ये जेव्हा तिरंगी लढत झाली तेव्हा ते तब्बल 46,412 मतांनी आणि 2019 मध्ये 28132 मतांनी विजयी झाले.
उमेदवाराचं नाव | पक्ष | एकूण मतं | टक्केवारी | |
1- मुश्रीफ हसन मियालाल | राष्ट्रवादी कॉंग्रेस | 1,16,436 | 44.17% | |
2- घाटगे समरजीतसिंग विक्रमसिंह | अपक्ष | 88,303 | 33.49% | |
3- संजय आनंदराव घाटगे | शिवसेना | 55,657 | 21.11% | |
4- नोटा | इतर | 1,163 | 0.44% | |
5- श्रीपती शंकर कांबळे | इतर | 825 |
|
उमेदवाराचं नाव | पक्ष | एकूण मतं | टक्केवारी |
1- मुश्रीफ हसन मियालाल | राष्ट्रवादी कॉंग्रेस | 1,23,626 | 49.16% |
2- घाटगे संजय आनंदराव | शिवसेना | 1,17,692 | 46.8% |
3- परशुराम सतप्पा तावारे | इतर | 5,521 | 2.2% |
4- सांता जवाबा बारर्दसकर | इतर | 1,035 | 0.41% |
5- वरीलपैकी काहीही नाही | इतर | 850 | 0.34% |
उमेदवाराचं नाव | पक्ष | एकूण मतं | टक्केवारी |
1- मुश्रीफ हसन मियालाल | राष्ट्रवादी कॉंग्रेस | 1,04,241 | 46.05% |
2- संजयसिंग (दादा) सदाशिवराव मंडलिक | अपक्ष | 57,829 | 25.55% |
3- भाटगे संजय अनानो | समाजवादी कामगार पक्ष | 57,271 | 25.3% |
4- शिंदे राजेंद्र गोविंद | इतर | 2,232 | 0.99% |
5- नागरात्र सिद्धार्थ अबासो | इतर | 1,977 | 0.87% |
विरोधक कोणीही असला तरी निवडणूक मीच जिंकणार असा दावा हसन मुश्रीफ करत आहेत. यासाठी त्यांनी संजय बाबा घाटगे यांच्यासोबत वर्षानुवर्षांपासून चालू असलेलं वैर मिटवलं आहे. संजय घाटगे यांनी निवडणुकीआधी तलवार म्यान केलं असून ते मुश्रीफांना पाठिंबा देणार आहेत. तर दुसरीकडे संजय मंडलिक यांनी काहीही करून महायुतीच्या उमेदवाराला निवडणून आणायचं असा प्रण केलाय. त्यामुळे तेदेखील मुश्रीफ यांच्याच बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे. या दोघांच्या पाठिंब्यामुळे मुश्रीफांचं पारडं जड झालं आहे. परंतु शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्या गटात गेल्याचा तोटा त्यांना थोड्याफार प्रमाणात बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. शरद पवार यांच्या गटाला मिळणाऱ्या या सहानुभूतीच्या लाटेला हसन मुश्रीफ कसं सामोरं जातील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे कागल विधानसभा मतदारसंघात स्वराज्य स्थापन करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचं म्हणणाऱ्या समरजितसिंग घाटगे यांना त्यांच्या घराण्याचा राजकीय वनवास संपवण्यात यश मिळेल का, याचंही उत्तर या निवडणुकीतून मिळेल.