मुंबई : ‘महाराष्ट्र महामंथन’ या ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष कार्यक्रमात देशातील युवा नेते हार्दिक पटेल, कन्हैया कुमार आणि भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांनी हजेरी लावली. यावेळी कन्हैया आणि हार्दिक या दोघांनीही देशातील विविध विषयांवर रोखठोक मतं मांडली.
आमचा प्लॅन ठरलाय!
तुम्ही केवळ मोदींविरोधात बोलत असता, देशभर बोलत फिरता, तुमच्याकडे ठोस असा प्लॅन काय आहे सांगा, या भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांच्या प्रश्नाला कन्हैया कुमारने तितक्याच प्रगल्भतेने उत्तर दिले. कन्हैया कुमार म्हणाला, “आम्हाला फक्त बोलायचं नाहीय. आम्ही देशासाठी नक्कीच काहीतरी करु. आम्ही केवळ बयानबाजी करत नाही तर प्रत्यक्ष कामही करतोय, शेतकऱ्यांच्या संघर्षात सहभागी होतोय. ‘सार्वभौम भारता’चा आम्ही आवाज बनू. जनजागृती करतोय”
तर, विविध मुद्द्यांवर जनतेला आम्ही जागे करु, असे हार्दिक पटेलने सांगितले. यावेळी गुजरातमध्ये ज्यावेळी उत्तर भारतीयांना मारहाण झाली, त्यावेळी हार्दिक पटेलच्या संघटनेने कशाप्रकारे हेल्पलाईन नंबर देऊन तेथील उत्तर भारतीय लोकांची मदत केली, हेही सांगितले.
“लोकशाही म्हणजे WWF ची मॅच नाही, आम्ही या देशातील सार्वभौम जनतेला पाठिंबा देतो. जनतेच्या सार्वभौमाला ठेच पोहोचवणाऱ्याला विरोध करतो” असेही कन्हैया कुमारने म्हटले. तसेच, देशात मोदींना पर्याय नाही, असं बिंबवलं जातंय, पण देशाची जनता हाच त्यांना पर्याय आहे, असेही कन्हैया म्हणाला.
“भारत माता की जय हे बोलायला हवंच. पण दंडुका घेऊन मागे लागल्याने कोणी देशभक्त आणि देशद्रोही ठरत नाही. भारत माता की जय म्हणणे म्हणजे देशावर प्रेम करणे. पण ते बोलूनच दाखवायला कशाला हवं? आपण आपल्या आईला प्रेम आहे सांगतो का?” असे कन्हैयाने ‘भारत माता की जय’ घोषणेच्या जबरदस्तीबाबत मत व्यक्त केले.
शेतकरी मुद्द्यावर कन्हैया काय म्हणाला?
शेतकरी तुमच्याकडे भीक नाही मागत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत द्या. तेव्हा आत्महत्या थांबतील, असे कन्हैयाने यावेळी सांगितले.
मोदींवर निशणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत ‘वास्को द गामा’सारखे देश फिरत आहेत. परराष्ट्र मंत्रिपदी सुषमा स्वराज की नरेंद्र मोदी आहेत, हा प्रश्न उभा राहतो, असा टोला कन्हैयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला.