नवी दिल्ली: अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) तिच्या राजकीय प्रवेशा संदर्भात मोठं विधान केलं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायला आवडेल असं तिने म्हटलं आहे. तसेच जनतेला वाटत असेल आणि भाजप (bjp) तिकीट देणार असेल तर मी निवडणूक लढायला तयार आहे, असंही तिने सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (pm narendra modi) उल्लेख तिने महापुरुष असा केला. पण दु:खाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी त्यांचे स्पर्धक आहेत, असा टोलाही तिने लगावला. एका राष्ट्रीय चॅनलशी संवाद साधताना तिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दुर्देवाची गोष्ट म्हणजे मोदींचा सामना राहुल गांधींसोबत आहे. तर राहुल गांधी यांच्यासाठी दुर्देवाची गोष्ट म्हणजे राहुल गांधींचा सामना राहुल गांधींशीच म्हणजे स्वत:शीच आहे. आपला कोणीच विरोधक नाहीये हे मोदींना माहीत आहे. त्यामुळे ते स्वत:च स्वत:ला प्रमोट करत आहेत. तर राहुल गांधी आपल्या लेव्हलवर प्रयत्न करत आहेत, असं कंगना म्हणाली.
हिमाचल प्रदेशातील निवडणुकांवरही तिने भाष्य केलं. हिमाचल प्रदेशातील जनता आपच्या खोट्या आश्वासनांना भूलणार नाही. हिमाचलच्या लोकांकडे स्वत:ची सोलर पॉवर आहे. ते स्वत: आपल्या भाज्या उगवतात. मोफतच्या घोषणांचा येथील जनतेवर परिणाम होणार नाही. तसेच आपलाही त्याचा फायदा होणार नाही. हिमाचलच्या लोकांना फुकटात काहीही नकोय, असंही तिने सांगितलं,
राजकारणात अनेक लोकांनी यावं असं मला वाटतं, असं ती म्हणाली. यावेळी तिने बॉलिवूडवर टीकाही केली. बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे. मात्र आता प्रेक्षक जागरूक झाले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आता जनता बदलली आहे. हे सर्व चालणार नाही असं लोक म्हणत आहेत. काम करून दाखवा असं लोक म्हणत आहेत. त्यामुळे आता स्टार कल्चर संपुष्टात आलं आहे, असा दावा तिने केला.
2014 पूर्वी आमचं कुटुंब काँग्रेसी होतं. मात्र, त्यानंतर आमचं कुटुंब बदललं. माझे वडील राजकारणात होते. काँग्रेसच्या माध्यमातूनच माझ्या वडिलांनी कामे केली आहेत. मात्र, मोदी सरकार आल्यानंतर सर्व काही बदललं. माझे वडील सकाळी उठल्यावर जय मोदी आणि संध्याकाळी जय योगी म्हणतात. आम्ही संपूर्णपणे भाजपमय झालो आहोत. असं वाटतं मोदी आमच्या कुटुंबातीलच एक आहेत, एवढा आमच्यात बदल झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.