सातारा : नगरपंचायतीचं नगरपरिषदेत रुपांतर झालेलया मलकापूर कराड नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 2 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 27 जानेवारीला मतदान होणार आहे. 28 जानेवारीला मतमोजणीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मलकापूर नगरपालिका निवडणूक कराड दक्षिण विधानसभा मतदार संघांची निवडणूकपूर्व रंगीत तालीम असून भाजपसह काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे.
गेल्या निवडणुकीत या स्थानिक स्वराज्य संस्थेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थक मनोहर शिंदे व अतुल भोसले यांनी एकत्रित येत माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटाचा 17-0 या फरकाने धुळा उडवत नगरपंचायतीची सत्ता काबीज केली होती. परंतु आता परिस्थिती बदलली असून गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचयासोबत असणारे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले हे भाजपमध्ये मंत्री असून चंद्रकांत पाटील आणि अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपरिषद जिंकण्यासाठी चंग बांधला आहे. तर मागील निवडणुकीत परस्पर विरोधी असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर हे दोन्ही नेते भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याची चिन्हे असून मलकापूरची निवडणूक फारच अटीतटीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे
नव्याने स्थापन झालेल्या कराड लगतच्या मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव पडले असून, ओबीसी महिला नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे. मलकापूर नगरपंचायतीचे न्यायालयाच्या आदेशानंतर नगरपरिषदेत रूपांतर झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात 9 प्रभाग पाडले असून 19 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे.
संबंधित बातमी : विलासरावांचा जावई थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना टक्कर देणार