बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केला आहे. काँग्रेसने उद्या तातडीने पक्षातील आमदारांची बैठकही बोलवली आहे. कर्नाटकात काँग्रेसने तब्बल १३५ जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी
राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कर्नाटकामधील जनतेचा मी आभार मानतो. या जनतेने द्बेषाच्या राजकारणास नाकारले आहे आणि प्रेमाचे राजकारण स्वीकारले आहे, असा टोला मोदी यांचे नाव न घेता त्यांनी मारला. पुढे राहुल गांधी म्हणाले, की कर्नाटकामधील निवडणूक आम्ही लोकांच्या मुद्यावर लढलो. जनतेच्या प्रश्नाला महत्व दिले. या ठिकाणी जनतेने भांडवलशाहीचा पराभव केला आहे.
शिवकुमार यांचा विजय
कर्नाटक निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर सोपावण्यात आली होती. डी. के. शिवकुमार हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पद मिळावं, अशी त्यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
दिल्लीमध्ये सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना बोलावण्यात येणार आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण, याचा दिल्लीत उद्या फैसला होणार आहे. मुख्यमंत्री पदासाठी दोघेही उत्सुक आहेत. काँग्रेसचे दोन पर्यवेक्षक यासाठी नेमण्यात आलेत. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक आहेत.
काँग्रेस अलर्ट
कर्नाटकात भाजपकडून ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस अलर्ट झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी आपले आमदार सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी ऑपरेशन हस्था सुरु केले आहे. या ऑपरेशन हस्थामध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद आणि खुद्द मल्लिकार्जुन खरगे आहेत. या ऑपरेशनुसार विजयी उमेदवारांना काऊंटिंग सेंटरवरूनच हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता काँग्रेसच्या विजयी आमदारांची बैठक होणार आहे. त्यावेळी हे सर्व आमदार हजर राहणार आहेत.