बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. 10 पैकी 5 एक्झिट पोल कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा दाखवली होती. त्यानुसार निकालाचा कल येत आहे. यामुळे JDS पुन्हा एकदा किंगमेकर होण्याची शक्यता वर्तवत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर येऊन जेडीएसने यापूर्वी तीनदा सरकार स्थापन केले आहे. आता चौथ्यांदा जनता दल सेक्युलर सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. म्हणजे पाचव्यांदा या परिवारातील व्यक्तीला सर्वोच्च पद मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
आधी वडील बहुमत नसताना पंतप्रधान अन् मुख्यमंत्री
नऊ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर एच.डी. देवगौडा १९६२ प्रथम अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. त्यानंतर ते जनता दलात दाखल झाले. १९९६ मध्ये भाजपचे १३ दिवसांचे सरकार पडल्यानंतर कमी जागा असताना एच.डी.देवगौडा पंतप्रधान झाले. 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997 पर्यंत बहुमत नसताना देवगौडा पंतप्रधान झाले होते. त्यापूर्वी 1994 ते 1996 दरम्यान बहुमत नसताना मुख्यमंत्री झाले.
मुलाने दोन वेळा सांभाळले मुख्यमंत्री पद
२००४ मध्ये ५८ जागा जेडीएसने जिंकल्या. त्यानंतर काँग्रेस व जेडीएसचे सरकार आले. परंतु दोन वर्षात कुमारस्वामी यांनी काँग्रेसची साथ सोडत मुख्यमंत्री झाले. ते पहिल्यांदा 2006 ते 2007 त्यानंतर 2018 ते 2019 या काळात मुख्यमंत्री झाले. दोन्ही वेळेस त्यांच्यांकडे बहुमत नव्हते.
काँग्रेस सावध
कर्नाटकात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना रोखण्यासाठी खास प्लान तयार केला आहे. स्वत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमदारांवर लक्ष ठेवून आहेत.
प्रतिष्ठेची निवडणूक
भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. कर्नाटकात पुन्हा सत्ता आणण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली होती. पंतप्रधान मोदी यांनी तर बजरंग बलीचा नाराही दिला होता. मात्र, असं असतानाही कर्नाटकात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. दक्षिणेकडील फक्त कर्नाटक राज्यातच भाजपचं सरकार आहे. या राज्यातून सत्ता गेली तर भाजपचं दक्षिण भारतातून उच्चाटन होईल असं चित्र आहे.