पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड व कसबा विधानसभेची (kasba and pimpri chinchwad bypoll election) पोटनिवडणूक २६ फेब्रवारी रोजी होणार आहे. परंतु अजूनही कोणत्याही पक्षाने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. तसेच भाजप निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत असताना महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याची तयारी पुर्ण केली आहे. त्यात आता भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक (Kunal Tilak) यांना प्रदेश प्रवक्ते केले. खरंतर गेल्या महिन्यात भाजपचे प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली होती.
भारतीय जनता पक्षाने नवीन यादीत कुणाल यांच्या नावाची भर घालून ती पुन्हा प्रसिद्ध केली. यामुळे भाजपचा उमेदवार टिळक परिवारातील नसणार का? ही चर्चा सुरु झाली आहे.
भाजपचा उमेदवार कोण
भारतीय जनता पार्टीच्यावतीने पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार याची चर्चा जोरात आहे. त्यातच पक्षाच्या प्रदेश शाखेने ४२ प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. या यादीत कुणाल टिळक (Kunal Tilak) यांचा नव्याने समावेश केला.भाजपकडून टिळक परिवाराऐवजी हेमंत रासने यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिल्लीवरुन लवकरच नावांची घोषणा होणार असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीत काय
कसबा पेठची जागा काँग्रेस तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीचा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे दोन्ही ठिकाणांवरुन ठाकरे गटाला माघार घ्यावी लागली. महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या नावाची घोषणा शनिवारी होणार आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघाची जागा रिक्त झाली तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. भाजपचे प्रयत्न असले तरी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत इच्छूक उमेदवारांची मोठी यादी तयार झाली असल्याचे दोन दिवसांपुर्वीच स्पष्ट केले होते.