ऋतुजा लटके यांचा राजीनामा का मंजूर होत नाही?; किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं नेमकं कारण

| Updated on: Oct 12, 2022 | 1:51 PM

एकनाथ शिंदे गट मुंबईत शाखा निर्माण करणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. नारायण राणे यांनीही अनेक शाखा उघडल्या होत्या. आता त्या शाखा कुठे आहेत?, असा टोलाही त्यांनी लगावला.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा का मंजूर होत नाही?; किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं नेमकं कारण
ऋतुजा लटके यांचा राजीनामा का मंजूर होत नाही?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रमेश शर्मा, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: ठाकरे गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (rutuja latke) यांनी महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. मात्र, त्यावरून राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाने या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. महापालिका आयुक्त हे सनदी अधिकारी आहेत. हे अधिकारी कायदा मानून चालतात असं वाटत होतं. पण सध्या चित्रं वेगळंच दिसत आहे. ऋतुजा लटके यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. काम न करण्याची इच्छा दर्शवली आहे. असं असताना त्यांचा राजीनामा मंजूर केला जात नाही. आयुक्तांवर राज्य सरकारचा दबाव आहे. त्यामुळेच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नाही, असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी केला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा आरोप केला. कोव्हिड काळात आम्ही इक्बालसिंह चहल यांच्यासोबत काम केलं. त्यांना नाव मिळालं. इतकं होऊन ते आज ट्रीगर पॉइंटवर काम करत आहेत. एका विधवाबाईने आपल्या पतीचं काम पुढे न्यायचं ठरवलं. म्हणून तिने नोकरीचा राजीनामा दिला. तरीही तिचा राजीनामा मंजूर केला जात नाही. सनदी अधिकारी नेहमीच नियमाने काम करत आहेत. मात्र इक्बाल चहल घाबरत आहेत. ते त्यांना घाबरवत आहेत. आयुक्तांवर दबाव आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत आहेत. मग ऋतुजा लटकेंची मुस्कटदाबी का सुरू आहे? तिची बांधिलकी ही शिवेसना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. तरीही मुस्कटदाबी का? असा सवाल त्यांनी केला.

ऋतुजा लटके यांनी नियमाने एक महिन्याचा पगारही भरला आहे. मात्र, महापालिकेतील अधिकारी नियमाने काम करत नाहीत. त्यांचा राजीनामा का दाबून ठेवला जात आहे? शिंदे-फडणवीस सरकार दबाव का आणत आहे? इक्बाल चहल हे घाबरत आहेत. नियमांची पायमल्ली करत आहेत, असं त्या म्हणाल्या.

समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ते निवडणूक आयोग बघून घेईल. आयोग एकदा दिलेला निर्णय मागे घेऊ शकत नाही. त्याबद्दल आमच्या मनात काहीच शंका नाही, असंही त्या म्हणाल्या.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला महापालिका घाबरत आहे. पण कोर्टाने तोंड फोडलं की महापालिका जागी होते, असं त्या म्हणाल्या. आम्ही कायदा हातात घेणार नाही. आम्ही संयमाने जाणार आहोत. आमच्या कृतीमुळे राष्ट्रपती राजवट लागू होईल असं काही आम्हाला करायचं नाहीये, असंही त्या म्हणाल्या.

एकनाथ शिंदे गट मुंबईत शाखा निर्माण करणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. नारायण राणे यांनीही अनेक शाखा उघडल्या होत्या. आता त्या शाखा कुठे आहेत?, असा टोलाही त्यांनी लगावला.