राजकारणात प्रवेश कसा झाला?, आदिती तटकरेंनी सांगितलं गुपित; वाचा राजकीय प्रवासाची चित्तरकथा!

| Updated on: Aug 08, 2021 | 9:24 AM

राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे सध्या राजकारणात स्थिरावल्या आहेत. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. (know about Raigad Guardian Minister Aditi Tatkare political journey)

राजकारणात प्रवेश कसा झाला?, आदिती तटकरेंनी सांगितलं गुपित; वाचा राजकीय प्रवासाची चित्तरकथा!
Aditi Tatkare
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे सध्या राजकारणात स्थिरावल्या आहेत. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो, तौक्ते वादळ असो की काल परवा आलेला महाड-चिपळूणमधील पूर असो. प्रत्येक ठिकाणी हजर राहून त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. त्यामुळे अभ्यासू आणि धडाकेबाज मंत्री म्हणून आदिती तटकरे यांची चर्चा आहे. आदिती तटकरे नेमक्या कोण आहेत? त्या राजकारणात कशा आल्या? याचा घेतलेला हा आढावा. (know about Raigad Guardian Minister Aditi Tatkare political journey)

आदिती तटकरे या अवघ्या 33 वर्षाच्या आहेत. वयाच्या 31व्या वर्षीच त्यांच्यावर राज्य मंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. त्यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या खात्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

जिल्हा परिषदेपासून सुरुवात

त्या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्यांनी एम. ए. पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यापूर्वीपासूनच आदिती राजकारणात सक्रिय आहेत. 2008-2009मध्ये वडिलांच्या प्रचार रॅलीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी श्रीवर्धन हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला होता. 2011-2012मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आदितींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस ज्वॉईन केली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. 23 फेब्रवारी 2017 रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या. 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिलं. 2019मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

खेळात अॅक्टिव्ह

मागे एकदा आदिती तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या विषयीच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या.मी शाळेत असताना वर्गात कमी वर्गाच्या बाहेर अधिक राहणारी विद्यार्थीनी होते. पण स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीमध्ये क्रियाशील होत, असं त्यांनी सांगितलं होतं.

शरद पवारच आदर्श

राजकारणात यायचं ठरवलं नव्हतं. वडील राजकारणात होते. त्यामुळे घरात राजकारणाचं वातावरण होतं. त्या वातावरणात वाढल्यानेच राजकारणाकडे ओढले गेले. विलासराव देशमुख आणि शरद पवारांना अत्यंत जवळून पाहण्याची संधी मिळाली. शरद पवारांकडे सर्व पिढ्यांशी संवाद साधण्याची कला आहे. माझे आजोबाा, वडील आणि माझ्याशी ते मनमोकळेपणाने संवाद साधतात. शरद पवार हेच माझे राजकारणातील रोल मॉडल आहेत. त्यांना पाहूनच मी राजकारणात आले, असं त्यांनी सांगितलं.

म्हणून राजकारणात आले

वडिलांची इच्छा असते मुलांनी राजकारणापासून लांब राहावं. त्यांनी संघर्ष पाहिलेला असतो. पण मी संघटनेत काम करायला सुरुवात केली. तेव्हा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनीयर होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनीही मला राजकारणात येण्याची संधी दिली, असं त्या सांगतात. तर, महिलांना राजकारणात मागे ठेवलं जातं असं वाटत नाही. महिला किंवा पुरुष हा दुजाभाव हा बघण्याचा दृष्टिकोण आहे. मला वेगळं खातं आहे. ते जनरल आहे. महिलांशी संबंधित नाही, असं त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. (know about Raigad Guardian Minister Aditi Tatkare political journey)

 

संबंधित बातम्या:

वयापेक्षाही जास्त संपत्ती असलेला युवा नेता; जाणून घ्या कोण आहेत ऋतुराज पाटील?

वडील न्यायाधीश झाल्याने वकिली सोडून मुंबई गाठली, अडवाणींच्या रथयात्रेने प्रभावित; मंगलप्रभात लोढा कसे घडले? वाचा

पहाटेच्या शपथविधीतून थेट पवारांना भेटले, पाचवेळा आमदार, चौथ्यांदा मंत्री; वाचा, कोण आहेत राजेंद्र शिंगणे

(know about Raigad Guardian Minister Aditi Tatkare political journey)