Atal Bihari Vajpayee : मुझे दहेज में पूरा पाकिस्तान चाहिए, पाकिस्तानी पत्रकारांची अटलबिहारी वाजपेयी विकेट काढतात तेव्हा…

| Updated on: Aug 16, 2022 | 11:02 AM

Atal Bihari Vajpayee : कारगिल युद्ध संपल्यानंतर काही मंत्री त्यांच्याकडे गेले. त्यांनी वाजपेयींना भारत रत्न देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी वाजपेयी भडकले. मीच काय स्वत:ला भारत रत्न देऊ का? असा सवाल त्यांनी केला.

Atal Bihari Vajpayee : मुझे दहेज में पूरा पाकिस्तान चाहिए, पाकिस्तानी पत्रकारांची अटलबिहारी वाजपेयी विकेट काढतात तेव्हा...
पाकिस्तानी पत्रकारांची अटलबिहारी वाजपेयी विकेट काढतात तेव्हा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान, भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी (atal bihari vajpayee) यांचा आज स्मृतीदिन आहे. प्रतिभावंत कवी, अमोघ वक्तृत्वाचे धनी, शांत, संयमी अन् तितकेच करारी नेते आणि अजातशत्रू म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची ख्याती होती. वाजपेयी हे अजातशत्रू असल्यानेच विरोधी पक्षाचे नेतेही त्यांचा आदर करायचे. ते प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत बिनधास्तपणे मांडायचे आणि दुसऱ्यांचं म्हणणं पटलं तर त्याचा स्वीकारही करायचे. दुसऱ्यांना मत मांडण्याची संधीही द्यायचे. एवढेच नव्हे तर माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनाही त्यांचं काम आवडायचं. राजकारणात (politics) असूनही ते निवडणुकांचं (election) कधी टेन्शन घेत नसायचे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते थेट सिनेमा पाहायला जायचे. एकदा तर अमेरिकेत गेल्यावर रांगेत उभे राहून त्यांननी डिझ्नेलँडचं तिकीट काढलं होतं. एकदा एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने तुम्ही लग्न का करत नाहीत? असा सवाल केला होता. तेव्हा, मला हुंड्यात संपूर्ण पाकिस्तान पाहिजे, असं म्हणत वाजपेयींनी पाकिस्तानी पत्रकारांची विकेट काढली होती.

‘मुझे दहेज में पूरा पाकिस्तान चाहिए’

भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले व्हावेत म्हणून त्यांनी 16 मार्च 1999मध्ये अमृतसर-लाहोर दरम्यान बस सेवा सुरू केली होती. त्यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते. ते स्वत: बसने अमृतसरहून लाहोरला गेले होते. पाकिस्तानात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचीही जोरदार चर्चा झाली. कार्यक्रमानंतर त्यांनी पाकिस्तांनी मीडियाशी संवाद साधला. पाकिस्तांनी पत्रकारांनीही त्यांनी दोन्ही देशाच्या संबंधाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले. वाजपेयींनी या प्रश्नांची उत्तरेही दिली.

हे सुद्धा वाचा

तेवढ्यात एका महिला पत्रकाराने वेगळाच प्रश्न विचारला. त्यामुळे सर्वांच्या नजरा या महिलेकडे खिळल्या आणि वाजपेयी काय उत्तर देतात याची उत्सुकता ताणली गेली. तुम्ही आतापर्यंत लग्न का केलं नाही? असा सवाल या महिला पत्रकाराने विचारला होता. थेट एका महिलेकडून हा सवाल आला होता. आणि ती महिला पत्रकारही पाकिस्तानची होती. त्यामुळे वाजपेयींनी थोडा पॉझ घेतला. मंद स्मित केलं आणि आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. वाजपेयी म्हणाले, मी लग्नासाठी तयार आहे. फक्त अट एकच आहे. मला हुंड्यात संपूर्ण पाकिस्तान पाहिजे. वाजपेयींच्या या उत्तरावर एकच हशा पिकला. पण पाकिस्तानच्या धर्तीवर जाऊन आपल्याला काय हवं आहे आणि आपण काय करणार आहोत, याचा एक प्रकारचा इशाराच वाजपेयींनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दिला होता.

अन् मुशर्रफ यांना पाकिस्तानात जावं लागलं

वाजपेयी आपले सिद्धांत आणि देशप्रेमासाठी परिचित होते. एका घटनेतून ते स्पष्ट झालं. कारगिलचं युद्ध संपलेलं होतं. भारत-पाकिस्तान संबंधात वितुष्ट आलं होतं. सर्व काही सुरळीत झालेलं नव्हतं. दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत म्हणून 2001मध्ये वाजपेयींनी परवेज मुशर्रफ यांना आग्रा भेटीचं निमंत्रण दिलं. यावेळी मुशर्रफ आणि वाजपेयींमध्ये चर्चा झाली. या चर्चेवेळी दहशतवाद या शब्दावरून वाद झाला. त्यावेळी वाजपेयींनी आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं. त्यामुळे मुशर्रफ यांना निराश होऊन पाकिस्तानात जावं लागलं होतं.

अन् भारत रत्न घेण्यास नकार दिला

वाजपेयी हे बडेजाव मिरवणारे नेते नव्हते. ते नेहरू-गांधी परंपरेतील नेते होते. देशवासियांना काय आवडेल, काय नाही आवडणार याची त्यांना चांगली माहिती होती. कारगिल युद्ध संपल्यानंतर काही मंत्री त्यांच्याकडे गेले. त्यांनी वाजपेयींना भारत रत्न देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी वाजपेयी भडकले. मीच काय स्वत:ला भारत रत्न देऊ का? असा सवाल त्यांनी केला. भविष्यात एखादं सरकार आलं आणि त्यांना वाटलं मला भारत रत्न द्यावं, तर ते देतील. पण मी स्वत:ला कधीच भारत रत्न घेणार नाही, असं ते म्हणाले.

देखिएगा सुबह जरूर होगी

लालकृष्ण अडवाणी हे वाजपेयींचे अत्यंत जवळचे मित्र होते. पक्षातील सहकारी होते. वाजपेयी हे कधीच निवडणुकीच्या पराभवाचं टेन्शन घेत नसायचे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सिनेमा पाहायला जायचे, असं अडवाणी सांगतात. दिल्लीत एकदा नयाबांसमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यावेळी आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली. पण पराभव झाला. तेव्हा या पराभवामुळे आम्ही दोघेही दु:खी झालो. त्यावेळी वाजपेयी म्हणाले, चला सिनेमा पाहायला जाऊ. आमचं कार्यालय अजमेरी गेटजवळ होते. त्यामुळे पहाडगंजमधील एका सिनेमागृहात आम्ही सिनेमा पाहायला गेलो. सिनेमा होता, फिर सुबह होगी. थिएटर जवळ आल्यावर वाजपेयी म्हणाले, आज आम्ही पराभूत झालोय. पण तुम्ही बघाल पुन्हा पहाट होईलच.