नवी दिल्ली: राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी कोर्ट सुरू होताच युक्तिवादाला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गट वारंवार आम्ही शिवसेना (shivsena) सोडली नाही असं सांगत आहे. शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही तर मग निवडणूक आयोगाकडे का गेला? असा सवाल कपिल सिब्बल यांनी करून शिंदे गटाला कोंडीत पकडलं आहे. तसेच हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देण्यास कपिल सिब्बल यांनी विरोध केला. या प्रकरणाची सुनावणी याच कोर्टात व्हावी, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, कोर्टाने पुढच्या सोमवारी या प्रकरणावर सुनावणी करणार असल्याचं सांगितलं. तसेच हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे द्यायचे की नाही हे सोमवारीच ठरवू असंही कोर्टाने स्पष्ट केलं.
शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण लार्जर बेंचकडे देण्याची गरज नाही, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. त्यावर हे प्रकरण लार्जर बेंचकडे द्यायचं की नाही हे आम्ही ठरवू, असं कोर्टाने स्पष्ट केलं. मात्र, नंतर या प्रकरणावर सोमवारी सुनावणी ठेवतानाच हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही हे सोमवारी ठरवू, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
ते म्हणत आहेत की त्यांना 50 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते राजकीय पक्ष असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. 40 आमदार अपात्र ठरले तर त्यांच्या दाव्याला आधार काय?, असा सवाल सिब्बल यांनी केला. 40 पैकी 50 आमदार अपात्र ठरणार असतील तर कोणत्या आधारावर ते राजकीय पक्ष असल्याचा दावा करतात? असा सवाल करतानाच संसदीय दलाचे 40 आमदार मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही, संसदीय दल आणि पक्ष दोन्ही वेगळी आहेत, असंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शिंदे गटाने पक्ष सोडला नाही. मग निवडणूक आयोगाकडे का गेले? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनीही युक्तिवाद केला. आम्ही वेगळ्या पक्षात गेलो नाही. आम्हीच शिवसेना आहोत. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात नेहमीच आरोप होत असतात. ते काही वेगळं नाही, असं सांगतानाच आमदारांवर अपात्रतेची कारवाई कशी होऊ शकते. आम्ही पक्ष सोडलेला नाही, असं साळवे यांनी सांगितलं.