विद्यार्थी नेता ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते; वाचा, प्रवीण दरेकर यांच्या आयुष्यातील ‘खाचखळगे’!

| Updated on: Mar 06, 2021 | 12:04 PM

मुंबै बँक घोटाळा प्रकरणामुळे भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (know political journey of bjp leader pravin darekar)

विद्यार्थी नेता ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते; वाचा, प्रवीण दरेकर यांच्या आयुष्यातील खाचखळगे!
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद
Follow us on

मुंबई: मुंबै बँक घोटाळा प्रकरणामुळे भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एक संवेदनशील, अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून दरेकर परिचित आहेत. विद्यार्थी नेते ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकिर्द थक्क करणारी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनेक खाचखळग्यांवर मात करत त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. दरेकरांच्या आयुष्यातील चढ-उतारांचा घेतलेला हा आढावा. (know political journey of bjp leader pravin darekar)

पोलादपूरनं घडवलं

प्रवीण यशवंत दरेकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वसाप गावचा. दरेकर यांचे वडील यशवंत दरेकर हे एसटी कंडक्टर होते. वडिलांची नोकरी सुटल्याने त्यांच्या आईला मासळी विक्री करून कुटुंबाचा घरखर्च भागवावा लागला. दरेकरांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पोलादपूर येथे झाले. पैसे नसल्यामुळे त्यांना शाळेत जाण्यासाठी पोलादपूरला पाच किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. हा काळ त्यांच्यासाठी कठीण होता आणि याच काळाने त्यांना घडवलंही.

मुंबईत आले आणि…

पोलादपूर येथे दहावी पास झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली. 1989मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून कॉमर्स विषयातून पदवी घेतली. शिक्षण सुरू असतानाच दरेकर हे शिवसेनेकडे ओढले गेले. त्यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय विद्यार्थी सेनेतून कामास सुरुवात केली. भाविसेचे राज्य सरचिटणीस म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आणि राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळखही निर्माण झाली.

पालिकेचं तिकीट मिळालं अन्…

भारतीय विद्यार्थी सेनेत काम करत असताना 1997मध्ये दरेकर यांना शिवसेनेने पालिका निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. दहिसरमधून दरेकर लढणार होते. तिकीट मिळाल्यानंतर मातोश्रीवर येऊन त्यांनी आभारही मानले. पण घरी येईपर्यंत त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं. शिवसेनेतील गटबाजीचा त्यांना फटका बसला होता. त्यामुळे दरेकर प्रचंड नाराज झाले होते.

राज ठाकरेंना साथ कायम

राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन 2006मध्ये मनसेची स्थापना केली. त्यावेळी दरेकर हे राज यांच्यासोबतच राहिले. मनसेच्या स्थापनेनंतर दरेकर यांची खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली. मनसेचे आक्रमक नेते म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. 2009मध्ये मनसेने निवडणूक लढवली. त्यावेळी दरेकर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. मुंबईतल्या मागाठाण्यातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. 2009 ते 2014 या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. त्यांचे बंधू प्रकाश दरेकरही महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.

घोटाळा आला आणि भाजपमध्ये गेले

मनसेच्या स्थापनेनंतर निर्माण झालेली राज ठाकरेंची लाट 2014 साल येईपर्यंत ओसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळे अनेक पक्षांचं पानीपत होत होतं. महाराष्ट्रात मनसेलाही या लाटेचा मोठा फटका बसला. 2014च्या निवडणुकीत दरेकर यांच्यासह मनसेचे अनेक शिलेदार पराभूत झाले. त्यानंतर मनसेला गळती लागण्यास सुरुवात झाली. अनेक नेत्यांनी भाजपकडे मोर्चा वळवला. त्यातच दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेचा घोटाळा बाहेर आल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यानंतर 2015मध्ये दरेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

काय आहे घोटाळा?

मुंबै बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाली आहे. हे कर्ज वाटप करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण दरेकर हे त्यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. बँकेच्या काही सदस्यांनी नाबार्डकडे या कर्ज वाटप प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी करण्यात आली असता केवळ कांदिवली पूर्व आणि अशोक वनमधील शाखांमधूनच 55 बोगस कर्जप्रकरणे उघडकीस आली होती. प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे 2000 पासून संचालक होते. 2010 पासून अध्यक्ष आहेत. या घोटाळ्याप्रकरणी 2015मध्ये विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर. शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. 1998 पासून 123 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

विधानपरिषदेवर निवड

भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी मागाठणेमधून निवडणूक लढण्यासाठी आग्रह धरला होता. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. 2016मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. एकेकाळी राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे दरेकर भाजप आल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले झाले. त्यामुळेच दिग्गजांना डावलून फडणवीसांनी त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांना बहाल केलं. दरेकर हे भाजपचे राज्य सचिव आणि भाजपच्या सहकार विभागाचे प्रमुखही आहेत. (know political journey of bjp leader pravin darekar)

दरेकरांची वाटचाल

राज ठाकरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी चळवळीतून वाटचाल

मनसेचा आक्रमक चेहरा, प्रमुख नेत्यांमध्ये समावेश

2009 ते 2014 मध्ये मनसेच्या तिकीटावर विधानसभेत

2015मध्ये भाजपात प्रवेश

2016मध्ये भाजपकडून विधनपरिषदेवर निवड

मुंबई जिल्हा बँकेत झालेल्या 123 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

सध्या विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत (know political journey of bjp leader pravin darekar)

 

संबंधित बातम्या:

‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते ‘शिवसेनेची रणरागिणी’, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर

ठाकरे कुटुंबीयांसोबत जमीन खरेदीत भागिदारी?; कोण आहेत रवींद्र वायकर वाचा सविस्तर!

प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!

(know political journey of bjp leader pravin darekar)