Shiv Sena: शिवसेनेविरोधात बंड केलेल्या नेत्यांसोबतच्या आमदारांचं पुढं काय झालं? विषय हार्डय समजून घ्या

| Updated on: Jun 21, 2022 | 5:06 PM

Shiv Sena: शिवसेनेत सर्वात पहिलं बंड छगन भुजबळ यांनी केलं होतं. 1991मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडली. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. तोपर्यंत शिवसेना कोणी सोडली नव्हती. पहिल्यांदाच कोणी तरी बाहेर पडत असल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला होता.

Shiv Sena: शिवसेनेविरोधात बंड केलेल्या नेत्यांसोबतच्या आमदारांचं पुढं काय झालं? विषय हार्डय समजून घ्या
शिवसेनेविरोधात बंड केलेल्या नेत्यांसोबतच्या आमदारांचं पुढं काय झालं? विषय हार्डय समजून घ्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे  (Eknath Shinde)यांनी शिवसेनेत बंड केलं आहे. 13 आमदारांना घेऊन त्यांनी थेट गुजरात गाठले आहे. शिंदे यांच्या या बंडामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेत (shivsena) शेवटचं मोठं बंड हे 2006 मध्ये झालं होतं. 2006मध्ये राज ठाकरे (raj thackeray) यांनी शिवसेना सोडली होती. त्यानंतर शिवसेनेतील कोणत्याही बड्या नेत्याने पक्ष सोडला नाही. काही किरकोळ नेते तेवढे सोडून गेले. म्हणजे तब्बल 16 वर्षानंतर शिवसेनेत बंड झालं आहे. त्यातही एकनाथ शिंदेंसारख्या मातब्बर नेत्याने बंड केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी केलेलं बंड जितकं मोठं होतं. तितकंच मोठं हे बंड असल्याचं सांगितलं जात आहे. कारण शिंदे यांच्यासोबत जवळपास 13 आमदार आहेत. तसेच शिंदे यांच्यामुळे अनेक महापालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला खिंडार बसणार आहे. त्यामुळेच शिवसेनेसाठी शिंदे यांचं बंड अत्यंत धक्कादायक असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे राजकारणात तग धरतील काय? शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचं जे झालं तेच शिंदे यांचं होणार का? असा सवालही केला जात आहे.

राजकारणात भुजबळ एकटेच तरले

शिवसेनेत सर्वात पहिलं बंड छगन भुजबळ यांनी केलं होतं. 1991मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडली. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. तोपर्यंत शिवसेना कोणी सोडली नव्हती. पहिल्यांदाच कोणी तरी बाहेर पडत असल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला होता. भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत 18 आमदार बाहेर पडणार होते. पण ऐनवेळी 12 आमदारांनी कच खाल्ली आणि सहा आमदारच त्यांच्यासोबत बाहेर पडले. मात्र, भुजबळ वगळता आज राजकारणात कोणताही आमदार टिकलेला नाही.

हे सुद्धा वाचा

शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. विरोधी पक्षनेते पदापासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. सध्या आघाडी सरकारमध्ये ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. भुजबळ काँग्रेसमध्ये आल्यानंतर काही वर्षांनी शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी भुजबळही पवारांच्यासोबत राहिले. मधल्या काळात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना दोन वर्षाचा कारावास झाला होता. मात्र, तुरुंगातून परत आल्यानंतर त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द नव्या जोमाने सुरुवात केली.

सेना सोडली, पण संस्थान राखलं

भुजबळ यांच्यानंतर 1999 मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. ते शिवसेनेचे नवी मुंबईतील महत्त्वाचे शिवसैनिक होते. नाईक यांच्यासोबत फारसे कोणी आमदार बाहेर पडले नाही. मात्र, गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेला नवी मुंबई महापालिका जिंकता आली नाही. नाईक यांनी नवी मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवली होती. नाईक हे राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीच्या सत्तेत त्यांना पर्यावरण मंत्रीपद आणि ठाण्याचे पालकमंत्रीपद मिळालं होतं. मात्र, मधल्या काळात निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर नाईक यांनी भाजप गाठली. सध्या ते भाजपचे आमदार आहेत. भाजपने त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं आहे.

सेना सोडली अन् केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारली

नारायण राणे यांनी शिवसेना सोडणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. राणे हे माजी मुख्यमंत्री होते. शिवसेनेचे ते दुसरे मुख्यमंत्री होते. 2005 मध्ये राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्यासोबत 10 आमदारांनी शिवसेना सोडली होती. मात्र, त्यातील कालिदास कोळंबकर वगळता कोणताही आमदार राजकारणात तग धरू शकला नाही. नंतर कोळंबकरांनीही राणेंची साथ सोडली. काँग्रेसने दिलेलं मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन न पाळल्याने राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र, अवघ्या दोन चार महिन्यातच राणे यांनी हा पक्ष गुंडाळून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यानंतर त्यांना केंद्रात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्रीपद दिलं आहे. काँग्रेसमध्ये असताना राणे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी राज्यात उद्योग मंत्रीपद आणि महसूल मंत्रीपद आदी महत्त्वाची मंत्रिपदे त्यांना देण्यात आली होती. तसेच त्यांच्या एका मुलाला आमदार तर दुसऱ्या मुलाला खासदार करण्यात आलं होतं. पण तरीही राणे सेनेत अस्वस्थ होते.

करून दाखवलं, पण…

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडणं हा सेनेसाठी आणि व्यक्तिश: ठाकरे कुटुंबासाठी मोठा धक्का होता. 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. पण त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. त्यांनी मनसेची स्थापना करून स्वतंत्र राजकारण सुरू केलं. तसेच त्यांनी शिवसेना सोडताना एकाही विद्यमान आमदार, खासदार आणि नगरसेवकाला सोबत घेतलं नाही. शिवसैनिक त्यांच्यासोबत आले. त्यांना घेऊनच त्यांनी आपलं राजकारण केलं. त्यात त्यांना यशही आलं. मुंबई महापालिका आणि विधानसभेत दोन आकडी लोकप्रतिनिधी निवडून आणण्यात त्यांना यश आलं. पण नंतर त्यांना हे सातत्य टिकवता आलं नाही. राज ठाकरे यांचा राजकारणातील करिश्मा आजही कायम आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दीही होते. पण त्याचं मतात परिवर्तन होत नाही.