कोल्हापुरातला बडा नेता भाजपावर नाराज, आज महायुतीच्या मेळाव्याकडे फिरवणार पाठ

| Updated on: Aug 22, 2024 | 11:27 AM

कोल्हापुरात आज महायुतीचा मेळावा संपन्न होणार आहे. पण या मेळाव्यात भाजपाचा एक बडा नेता सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. कारण तिकीटावरुन हा नेता नाराज आहे. पुढच्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

कोल्हापुरातला बडा नेता भाजपावर नाराज, आज महायुतीच्या मेळाव्याकडे फिरवणार पाठ
महायुती
Follow us on

आज कोल्हापुरात महायुतीचा मेळावा होणार आहे. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने, समन्वय साधून काम करावं, यासाठी हा मेळावा होत आहे. कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा संपन्न होणार आहे. माझी लाडकी बहीण सन्मान कार्यक्रम होईल. त्याचवेळी कोल्हापुरात आणखी एक चर्चा सुरु आहे. कोल्हापुरातील भाजपाचा एक मोठा नेता या मेळाव्याकडे पाठ फिरवणार आहे. आज कोल्हापूर मध्ये होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला भाजप नेते समरजित घाटगे उपस्थित राहणार नाहीत. देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये येत असताना पहिल्यांदाच समरजित घाटगे अनुपस्थित राहणार आहेत.

पुढच्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. महायुतीमध्ये शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. सध्या ज्या पक्षाकडे ज्या जागा आहेत, त्या जागा त्याच पक्षाकडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता नसल्याने विधानसभा निवडणुकीआधी पक्ष बदल होऊ शकतो.

महत्त्वाचा निर्णय पक्का झाल्याची माहिती

अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली. समरजित घाटगे इथून लढण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं समजतंय. समरजीत घाटगे यांनी मागच्या काही वर्षांपासून आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने कागलमध्ये बांधणी केली आहे. त्यामुळे ते पक्षांतर करु शकतात. समरजीत घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश जवळपास नक्की मानला जातोय. शरद पवार गटात प्रवेश करणार असल्यानेच घाटगे आज महायुतीच्या मेळाव्याला येणार नसल्याची माहिती आहे.