मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद राज्यात पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. त्यात लतादीदींचं स्मृतीस्थळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Chatrapati Shivaji Maharaj Park) इथं उभारण्याची मागणी कदम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राम कदम यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं लतादीदींचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारावं अशी मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लतादीदींच्या स्मारकाबाबत राजकारण करू नये. लतादीदी या महान व्यक्तिमत्व होत्या. त्यांचं स्मारक उभारणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी केंद्र सरकारनेच विचार केला पाहिजे, असं मत व्यक्त केलंय. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता राम कदम यांनीही पलटवार केला आहे.
आमदार राम कदम म्हणाले की, भारतरत्न लतादीदींवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले तिथे त्यांचं भव्य स्मारक उभं करावं ही कोट्यवधी चाहत्यांची इच्छा आहे. राजकारण करु नका म्हणता आणि स्वत:च परत केंद्र सरकारकडे बोट दाखवता. सत्ता तुमची, सरकार तुमचं आहे. जिथे अंत्यसंस्कार झाले तिथेच त्यांचं स्मारक जाहीर करा. नाना पटोले म्हणत असतील तर मग अडवलं कुणी तुम्हाला? सरकार कुणाचं आहे, तुमचंच ना. मग थेट निर्णय घ्या. विलंब करु नका, विलंब होत असेल तर मी शरद पवारांनाही पत्र लिहिन. हे स्मारक व्हावं ही असंख्य चाहत्यांची इच्छा आहे, असंही राम कदम यांनी म्हटलंय.
राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लतादीदींचं स्मृती स्थळ शिवाजी पार्कात उभारण्याची मागणी केली आहे. दादरच्या शिवाजी पार्कात लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या शिवाजी पार्कात लतादीदी पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच ठिकाणी त्यांचं स्मृती स्थळ उभारण्यात यावं. जनतेच्या मागणीचा सन्मान करून तात्काळ हे स्मृती स्थळ निर्माण केलं पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
तुरंत आप जन भावना का सन्मान करे और तुरंत उस जगह पर प्रेरणा देनेवाली #स्मृतीस्थळ बनायें pic.twitter.com/RcnaSjPCgA
— Ram Kadam (@ramkadam) February 7, 2022
‘लता दिदी या महान आत्मा होत्या. आपल्या धरतीवर त्यांनी जन्म घेतला, महाराष्ट्राशी त्यांचं नातं होतं. या देशात त्यांनी जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे. त्या शरीराने गेल्या. आत्मा आपल्याकडे आहे. त्या अमर आहेत, अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. बोलू द्या. त्यांचं स्मारक बनवणं इतकं सोपं नाही. त्या काही राजकीय नेत्या नव्हत्या. त्या खूप मोठ्या होत्या. महान होत्या. त्यांच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल’, असं संजय राऊत म्हणाले.
लता मंगशेकर यांचं शिवाजी पार्कात स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी भाजपने केली आहे. पटोले यांनीही भाजपच्याया सूरात सूर मिसळला आहे. लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कातच झालं पाहिजे. त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीचे स्मारक शिवाजी पार्कात झालं पाहिजे. लतादीदींचं स्मरण कायम राहावं यासाठी त्यांचं आंतरराष्ट्रीय पातळीचं स्मारक झालं पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :