सोलापूर : सत्ता कशी मिळवायची असते, ते प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना लगावला. तसेच, प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत आले, तर त्यांनही मंत्रिपद मिळेल, असेही रामदास आठवले म्हणाले. सोलापुरात रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याने प्रकाश आंबडेकर यांच्याबाबत मला नितांत आदर आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीमुळे भाजप-शिवसेनेचाच फायदा होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजप-शिवसेनेचा फायदा करण्यापेक्षा त्यांनी माझ्यासोबत यावं.” असं आवाहन रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना केलं.
“वंचित आघाडीमुळे मागासवर्गीय मतांचे विभाजन झाल्याने, त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये.”, असा टोलाही आठवलेंनी यावेळी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
मी हवा बघून निर्णय घेत असतो. अनेकवेळा प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत काम करण्यासाठी आपण पुढाकार घेतला. मात्र प्रकाश आंबडेकर यांची माझ्यासोबत काम करण्याची तयारी आहे की नाही, याबाबत मी अनभिज्ञ आहे, असेही आठवले यावेळी म्हणाले.
रामदास आठवले हे सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत, तर प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे नेते आहेत. शिवाय, आंबेडकरांनी एमआयएमच्या असदुद्दीने ओवेसी यांच्यासोबत एकत्र येत वंचित बहुजन विकास आघाडी स्थापन केली असून, या आघाडीच्या माध्यमातून ते लोकसभा निवडणुका लढणार आहेत.