धुळे/अहमदनगर : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. अहमदनगर महापालिकेच्या 68 जागांपैकी बहुमताचा 35 हा आकडा कोणालाच गाठता आला नाही. त्यामुळे अहमदनगर महापालिका त्रिशंकू झाली आहे. तर धुळे महानगरपालिकेच्या 74 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 50 जागा मिळवल्या. भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा केवळ एक उमेदवार निवडून आलाय. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत धुळे महापालिकेत बहुमत मिळवलंय. याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतमोजणी पार पडली.
दोन्ही महापालिकेसाठी रविवारी मतदान झालं. त्यानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. धुळ्यात 60 टक्के, तर अहमदनगरमध्ये 67 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. धुळ्यात भाजपसमोर स्वतःच्या पक्षातील आमदार अनिल गोटेंचं आव्हान होतं, तर नगरमध्ये शिवसेनेचं आव्हान होतं. धुळे महापालिकेत 19 प्रभागातील 74 जागांचा तर अहमदनगर पालिका निवडणुकीत 17 प्रभागातील 68 जागांचा निकाल आज जाहीर झाला.
नगरमध्ये त्रिशंकू स्थिती, शिवसेना सर्वात मोठा पक्ष
विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस (5) चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे आघाडीच्या 23 जागा आल्या आहेत. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय. 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता आहे.
अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018
शिवसेना – 24
राष्ट्रवादी -18
भाजप -14
काँग्रेस – 5
बसपा – 04
समाजवादी पक्ष – 01
अपक्ष 2
एकूण – 68
धुळे महापालिकेवर अखेर भाजपचा झेंडा, अनिल गोटेंच्या पक्षाचा सुपडासाफ
भाजप विरुद्ध भाजप लढाईत कोण जिंकणार याचा निर्णय अखेर लागलाय. भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा केवळ एक उमेदवार निवडून आलाय. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत धुळे महापालिकेत बहुमत मिळवलंय. याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
LIVE UPDATE
नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं
अहमदनगरमधील समीकरणं काय?
अहमदनगरच्या पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. अहमदनगरची पालिका निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. कारण, सुरुवातीपासूनच भाजप प्रचारात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. भाजपने निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी स्टार प्रचारकांची फौज उभी केली होती. तर प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडला. समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, तर सांगता सभेला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधीनी देखील मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यात खासदार दिलीप गांधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासोबत मुलगा सुवेंद्र आणि दीप्ती गांधी यांनाही देखील निवडून आणायचंय. तर पालिकेत आमचीच सत्ता येणार असा आत्मविश्वास खासदार दिलीप गांधीनी व्यक्त केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर शिवसेनेला सत्ता राखण्याचं आव्हान आहे. शिवसेनेने अहमदनगर महापालिकेत सर्वाधिक जास्त काळ सत्ता उपभोगली आहे. पण यावेळी शिवसेनेसमोर भाजपचं आव्हान असेल.
धुळ्यात भाजप वि. भाजप
धुळ्यात आमदार अनिल गोटेंच्या (लोकसंग्राम पक्ष) रूपाने भाजपविरोधात भाजपा अशी लढत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी असून, शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. भाजपाविरोधात सर्वच पक्ष एकवटले आहेत. काही प्रभागात या पक्षांनी एकमेकांना पडद्यामागून पाठिंबा दिला आहे.
19 प्रभागातील 74 जागांवर राष्ट्रवादी आणि भाजपने एकमेकांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यात काही ठिकाणी विद्यमान नगरसेवक एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. सर्वात जास्त उमेदवार प्रभाग क्रमांक 3, 7, 8 मध्ये असून, सर्वात कमी उमेदवार प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहेत. 355 उमेदवारांपैकी 189 पुरुष तर 166 महिला उमेदवार आहेत.
2013 च्या निवडणुकीत विजय संपादन केलेल्या 36 नगरसेवकांची प्रतिष्ठा पुन्हा या निवडणुकीत पणाला आहे. तर 17 माजी नगरसेवकांनी पुन्हा भाग्य अजमावलंय. यंदाच्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. तसेच 13 आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारी करत आहेत.