मुंबई | 14 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत. तसेच चार विद्यामान खासदारांचे तिकीट कापले आहे. एकूण 72 जणांची नावे आहेत. त्यात एक नाव शिवसेना उबाठा पक्षातील खासदाराचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का भाजपने दिला आहे. या यादीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे अशा दिग्गजांची नावे आहेत. परंतु दादरा आणि नगर हवेलीमधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या विद्यामान खासदार कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आहे. तसेच महाराष्ट्रातील चार विद्यामान खासदारांचे तिकीट कापले आहे. त्यात जळगावातून उन्मेष पाटील, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचा समावेश आहे.
भाजपने दुसऱ्या यादीत दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदार संघातून शिवसेना उबाठाच्या खासदार कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आहे. डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांचा २०२१ मध्ये मुंबईमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने महेश गावित यांना तिकीट दिले. तर शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत कलाबेन डेलकर 51,000 मतांनी विजय झाल्या. त्या पोटनिवडणुकीत सहानभुतीच्या लाटेवर कलाबेन डेलकर यांचा विजय झाला.
दादरा आणि नगर हवेलीमधून सात वेळा खासदार असलेले 58 वर्षीय मोहन डेलकर यांचा 22 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हमधील एका हॉटेलात मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांना दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने हा मुद्दा लावून धरला होता. मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे प्रकरण तापले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीत मोहन डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर निवडणूक रिंगणात उतरल्या. त्यांचा पोटनिवडणुकीत विजय झाला.
डिसेंबर 2023 मध्ये कलाबेन डेलकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो समोर आला होता. त्यावेळी कलाबेन यांनी ही भेट शिष्टाचाराची असल्याचे म्हटले होते. परंतु त्याचवेळी त्या भाजपच्या वाटेवर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.