लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला जाहीर होणार आहे. या निकालाआधी प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही. तर शरद पवार गट हा अजित पवार गटापेक्षा सरस ठरणार आहे. तसेच ठाकरे गटाला देखील या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा होणार असल्याचा दावा अनिल थत्ते यांनी केला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात महायुतीचेच सर्वाधिक उमेदवार जिंकणार असल्याचं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे. महायुती महाराष्ट्रात 37 ते 40 जागा जिंकणार तर उर्वरित जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार, असा मोठा दावा अनिल थत्ते यांनी वर्तवला आहे. अनिल थत्ते यांनी देशात महायुतीच्या किती जागा येणार? याबाबतही भाकीत वर्तवलं आहे. तसेच बारामती, ठाणे, कल्याण लोकसभेच्या जागांवर कोण जिंकणार? याबाबतही भविष्यवाणी सांगितली आहे.
“महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील, असा माझा अंदाज आहे. मात्र महाविकास आघाडी गेल्यावेळी शूद्र पातळीवर होती. त्यामानाने त्यांच्यामध्ये इम्प्रूमेंट होईल. त्यांना जर 37 मिळाल्या तर उर्वरित सीट महाविकास आघाडीला मिळतील. दोन अंकी आकडा महाविकास आघाडी गाठेल, असं मला वाटतं. अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा मला अंदाज आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये शरद पवार सरस होतेच, आहेत आणि यावेळी अधिक सरस झाले आहेत. ठाकरे गटाला सहानुभूती आहे यात शंका नाही”, असं मोठं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं आहे. “अजित पवारांना महायुतीत घेतल्याने ऑलरेडी तोटा झालाय. त्यांचे डझनभर मंत्री सोसावे लागले आणि त्यांच्यामध्ये ती लॉयल्टी दिसली नाही”, असंदेखील मोठं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं.
“भारतीय जनता पार्टीने 400 पारचा नारा इतका लावला की 350 जरी मिळाल्या तरी लोक म्हणतील 400 कुठे मिळाले? यात महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात मोठा असेल, असं गृहीत धरलं होतं. वातावरण इतकं विचलित आणि गढूळ झालं होतं, संभ्रम निर्माण झाला होता. मात्र माझा अंदाज असा आहे की, 35 ते 40 जागा महायुतीला येतील. महायुतीला 35 ते 40 जागा मिळतील, असा माझा 100 टक्के विश्वास आहे. म्हणजेच 8 ते 13 जागा महाविकस आघाडीला मिळतील”, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं.
“महाआघाडीने प्रचारात घेतलेले दोन मुद्दे खूप महत्त्वाचे ठरले. सत्ताधाऱ्यांना बहुमत मिळाले तर ते संविधान बदलतील. आपल्या समाजात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाबद्दल नातं जपलेले अनेक लोक आहेत. त्यामुळे ते लोक विचलित झाले. त्यात त्यांना यश मिळाले. संविधानाबरोबरच हुकुमशाही देखील येईल. त्यामुळे मुस्लिम वर्ग आणि दलित वर्ग दुखावला. तर महायुतीने केवळ मोदींचा चेहरा हा एकच मुद्दा मांडला. महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात इतर राज्यांमध्ये दिसतो तेवढा कडवटपणा नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम हा मुद्दा महाराष्ट्रात फार चालेल असं मला वाटत नाही”, असं अनिल थत्ते म्हणाले.