मुंबई : महाराष्ट्रत पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) 7 जागांसाठी मतदान, दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) 10 जागांसाठी मतदान पार पडलं. उद्या म्हमजे 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या सर्व 14 जागांवर चुरशीच्या लढती पाहायला मिळतात. या जागांवर गेल्या निवडणुकीत म्हणजे 2014 साली काय स्थिती होती आणि यंदाच्या लढतीचं चित्र काय, यावर एक नजर टाकूया :
माढा लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : माढा लोकसभा मतदारसंघातून 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते. मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीने माढ्याचा गड राखला होता. मोहिते पाटलांनी सदाभाऊ खोत यांना 25 हजार 344 मतांनी पराभूत केलं होतं. विशेष म्हणजे, यावेळी हे दोघेही भाजपच्या गोटात आहेत.
यंदा लढत कुणाची : राज्यसह देशभरात माढा मतदारसंघ चर्चेत राहिला. कारण इथून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लढणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यानंतर अनेक राजकीय हालचाली इथे घडल्या. भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं, तर काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने तिकीट दिलं आहे. त्यामुळे लढत चुरशीची होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं हे होमग्राऊंड आहे. त्यामुळे बारामतीच्या सर्वच निवडणुकांच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शरद पवार, अजित पवार यांनी नेतृत्त्व केलेल्या या मतदारसंघात 2009 पासून सुप्रिया सुळे खासदार आहेत. गेल्यावेळी रासपच्या महादेव जानकर आणि ‘आप’च्या सुरेश खोपडेंचा पराभव सुप्रिया सुळेंनी केला होता. सुप्रिया सुळे 69 हजार 719 मतांनी विजयी झाल्या होत्या.
यंदा लढत कुणाची : बारामतीतून यंदाही राष्ट्रवादीने सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर वंचित बहुजन आघाडीने नवनाथ पडळकर यांना तिकीट देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांसह भाजप, शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी बारामतीत कांचन कुल यांच्यासाठी प्रचार केला असल्याने, सुप्रिया सुळे यांना मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : 2009 सालापासून शिवसेनेचे नेते अनंत गीते हे रायगडमधून खासदार आहेत. गीते हे सध्या केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योगमंत्री आहेत. 2014 साली राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आव्हान दिले होते. मोदी लाटेतही गीते यांना निसटता विजय मिळाला होता. गेल्यावेळी सुनील तटकरेंना नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराचा फटका बसला होता. केवळ 2 हजार 110 मतांनी अनंत गीते हे विजयी झाले होते.
यंदा लढत कुणाची : शिवसेनेच्या अनंत गीते यांना यंदाही राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेच आव्हान देत आहेत. त्यामुळे रायगडमधील लढत यंदाही चुरशीची झाली आहे. त्यात यंदाही सुनील तटकरेंच्या नावाचे दोन आणखी ‘सुनील तटकरे’ रिंगणात आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसने टिकवलेली आणखी एक जागा म्हणजे कोल्हापूरची जागा. इथून राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिकांचा पराभव केला होता. महाडिकांनी मंडलिकांचा 33 हजार 259 मतांनी पराभव केला होता.
यंदा लढत कुणाची : कोल्हापूरमध्ये यंदा चुरशीची लढत असेल. कारण गेल्यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांच्या मदतीने विजयी झालेल्या धनंजय महाडिकांनी यंदा मात्र सतेज पाटलांशी वैर घेतलं आहे. त्यामुळे धनंजय महाडिकांनी मोठा फटका बसेल.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : 2014 साली मोदी लाटेचा फटका डॉ. निलेश राणेंना बसला आणि ते पराभूत झाले. रत्नागिरी सिंधुदुर्गातून 2014 साली शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले. राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मोठा विजय मिळवल्याने, या मतदारसंघाची राज्यभर चर्चा झाली.
यंदा लढत कुणाची : यंदाही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध निलेश राणे अशीच लढत होणार आहे. शिवसेनेकडून विनायक राऊत, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे लढत आहेत. यंदा काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर हे लढत आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : उदयनराजे भोसले यांचं वर्चस्व असलेला सातारा लोकसभा मतदारसंघ मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडे राहिला होता. 2014 साली उदयनराजे भोसले यांनी अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना 3 लाख 66 हजार 594 मतांनी पराभूत केलं होतं.
यंदा लढत कुणाची : यंदा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेते गेलेल्या नरेंद्र पाटील हे आव्हान देणार आहेत. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते आहेत. मात्र, या मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान असेल.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी विद्यमान खासदार आहेत. 2014 साली त्यांनी राष्ट्रवादीकडून लढलेल्या निवेदिता माने आणि शिवसेनेकडून लढलेल्या रघुनाथ पाटील यांचा पराभव केला होता. तब्बल 1 लाख 77 हजार 810 मतांच्या फरकाने राजू शेट्टींनी विजय मिळवला होता.
यंदा लढत कुणाची : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून हॅटट्रिक साधण्यासाठी खासदार राजू शेट्टी तयार झालेत. मात्र, यंदा ते आघाडीच्या गोटात आहेत. राजू शेट्टींना यंदा निवेदा माने यांचा मुलगा धैर्यशील माने टक्कर देणार आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात पहिल्यादाच भाजपने शिरकाव केला. 2014 साली संजयकाका पाटील यांनी काँग्रेस नेते प्रतिक पाटील यांचा पराभव केला. वसंतदादांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. काँग्रेसचे परंपरागत मतदार या जिल्ह्यात आहेत. मात्र, तरीही भाजपच्या संजयकाका पाटलांनी तब्बल 2 लाख 39 हजार 292 मतांच्या फरकाने प्रतिक पाटलांचा पराभव केला.
यंदा लढत कुणाची : सांगलीतील यंदाचे चित्र अत्यंत चुरशीचे आहे. कारण काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला. त्यामुळे नाराज झालेल्या वसंतदादांचे नातू प्रतिक पाटील यांची समजूत कढण्यासाठी स्वाभिमानीने थेट विशाल पाटील यांनाच उमेदवारी दिली. दुसरीकडे, पुन्हा एकदा संजयकाका पाटील रिंगणात आहेत. मात्र, आणखी एक उमेदवार यंदा सांगलीची निवडणुकीत उतरला आहे, तो म्हणजे वंचित बहुनज आघाडीकडून गोपीचंद पडळकर.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : 2014 साली दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दिलीप गांधी यांनी विजय मिळवला होता. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते राजीव राजळे यांचा दिलीप गांधींनी तब्बल 2 लाख 9 हजार 122 मतांनी पराभव केला होता.
यंदा लढत कुणाची : यंदा मात्र दक्षिण नगरच्या जागेवरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राज्यातील सर्वात लक्षवेधक लढत म्हणून या जागेकडे पाहिलं जात आहे. कारण काँग्रसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे भाजपकडून, तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादीकडून इथून लढत आहेत. दक्षिण नगरचा नेता कोण, यासाठी मोठी चुरस संग्राम जगताप आणि सुजय विखे या दोन तरुण उमेदवारांमध्ये दिसून येत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : पुण्यातून 2014 साली भाजपचे अनिल शिरोळी यांनी काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा 3 लाख 15 हजार 769 मतांनी पराभव केला होता. यावेळी मनसेकडून दीपक पायगुडे, आपकडून सुभाष वारेही रिंगणात होते. मोदी लाटेचा मोठा फायदा अनिल शिरोळे यांना झाला होता.
यंदा लढत कुणाची : पुण्यातून भाजपने विद्यमान खासदाला तिकीट न देता, पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी दिली आहे, तर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. फारशी चुरशीची लढत नसली, तरी गिरीश बापट यांच्यासाठी ही लढत सोपीही नाही.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 1999 पासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. 2014 सालीही चंद्रकांत खैरे विजयी झाले होते. काँग्रेसच्या नितीन पाटील यांचा 1 लाख 62 हजार मतांनी चंद्रकांत खैरे यांनी पराभ केला.
यंदा लढत कुणाची : यंदा औरंगाबादमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कारण चंद्रकांत खैरे यांना यंदा वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएमचे आमदार इम्तिजाय जलील यांचं आव्हान असेल. शिवाय, रावसाहेब दानवे यांचे जावई आणि शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून औरंगाबादमधून लढत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनीही बंड केल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. 2014 सालीही रावसाहेब दानवे इथून विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेसच्या विलास औताडेंचा तब्बल 2 लाख 6 हजार 798 मतांनी दानवेंनी पराभव केला होता. तर बसपचे शरदचंद्र वानखेडे यांनीही उल्लेखनीय मतं मिळवली होती.
यंदा लढत कुणाची : यंदा जालना मतदारसंघावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर हे जालन्यातून लढण्यास इच्छुक होते. मात्र, युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर खोतकरांनी माघार घेतली आणि दानवेंची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाली. यंदा फारशी चुरस नसली, तरी माध्यमांसमोर खोतकरांची मिटलेली नाराजी मतांसाठीही मिटली आहे की, धुसफूस आहे, हे निवडणुकीनंतरच कळेल.
रावेर लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : रावेर हा एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातील मतदारसंघ आहे. 2014 साली एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे जिंकल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या मनिष जैन यांचा तब्बल 3 लाख 18 हजार 68 मतांनी पराभव केला.
यंदा लढत कुणाची : रावेरमधून यंदाही रक्षा खडसे यांचेच पारडे जड असेल, असा राजकीय विश्लेषकांचं मत आहे. काँग्रेस उल्हास पाटील यांना तिकीट दिलं आहे. फारशी चुरशीची ही लढत नसेल, असेही अनेकांचे मत आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ
2014 सालचं चित्र : 2014 साली ए टी नाना पाटील हे भाजपकडून विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या वसंतराव डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला होता. बसप आणि आपनेही या निवडणुकीत उडी घेतली होती. मात्र, ए टी नाना पाटील हे मोठ्या फरकाने विजयी झाले होते.
यंदा लढत कुणाची : जळगावात भाजपने आधी स्मिता वाघ यांना तिकीट दिलं होतं, मात्र त्यांचं तिकीट काढून घेऊन उन्मेश पाटील यांना तिकीट दिलं, तर राष्ट्रवादीने गुलाबराव देवकर यांना रिंगणात उतरवलं आहे.