लोकसभा मतदारसंघात महायुतीतच राजकीय राडा, तिकीट न मिळाल्याने हे नेते नाराज

| Updated on: Mar 18, 2024 | 9:34 PM

Loksabha election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजीत नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील नेत्यांमध्येच नाराजी पाहायला मिळतीये. कोणकोणते नेते नाराज आहेत. सध्या काय हालचाली सुरु आहेत जाणून घ्या.

लोकसभा मतदारसंघात महायुतीतच राजकीय राडा, तिकीट न मिळाल्याने हे नेते नाराज
Follow us on

Loksabha election : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतच राजकीय राडा सुरू झालाय. भाजपकडून रणजीत नाईक निंबाळकरांना यंदाही उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील नेत्यांमध्येच नाराजी पाहायला मिळतीये. तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटलांनी खासदार निंबाळकर विरोधकांची मोट बांधलीये. धैर्य़शील मोहिते पाटील शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांनाही जोर चढलाय.

महायुतीत माढ्यात तिढा बिकट होत चाललाय. ज्या मोहितेंच्या बळावर गेल्यावेळी भाजपचे रणजितसिंह निंबाळकर माढ्यातून जिंकून आले.,
त्याच मोहितेंना डावलून यंदा पुन्हा रणजितसिंहांना तिकीट मिळाल्यानं माळशिरसचे मोहिते नाराज आहेत.

मोहितेंचे पुतणे धैर्यशील यंदा भाजपकडून इच्छूक होते. मात्र तिकीट न मिळाल्यानं समर्थकांनी शरद पवारांच्या पक्षातून लढण्याचा आग्रह धरला. काल मोहितेंच्या घरी बैठकही झाली. बैठकीनंतर मनधरणीसाठी आलेल्या गिरीश महाजनांना रोषालाही सामोरं जावं लागलं. तो रोष पाहून २ दिवसांपूर्वीची महाजनाची भूमिकाही मवाळ झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे धैर्यशील पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याकडे कल आहे. मात्र विजयसिंहांचे पुत्र रणजितसिंह मोहिते भाजप सोडू नये, या मताचे आहेत. दुसरीकडे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर मात्र मोहिते पाटलांच्या बैठकीवर उपरोधिक टीका करत आहेत.

नाराजी, मनधरणीचे प्रयत्न आणि बैठकांचा सिलसिला सुरु आहे. काल माळशिरसमध्ये मोहिते पाटलांच्या घरी भाजपच्या उमेदवारीवरुन नाराज झालेल्यांची बैठक झाली. धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या पक्षाकडून लढण्याच्या घोषणा समर्थकांनी दिल्या. या बैठकीनंतर मनधरनीसाठी भाजपच्या गिरीश महाजनांनी मोहितेंच्या घरी धाव घेतली. तिकडे मोहिते पाटलांकडच्या बैठकीनंतर शेकापचे जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत आले. त्यानंतर दुपारी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी माढ्यात मोहिते पाटलांना डावलून बैठकीचं आयोजन केलं.

मोहितेंकडच्या बैठकीत विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, फलटणचे अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर, त्यांचे बंधू संजय निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील, सांगोल्यातील गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख, शिंदेंच्या शिवसेनेतून राजीनामा दिलेले संजय कोकाटे उपस्थित होते.

त्याच्या काही वेळानंतर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी दुसऱ्या एका बैठकीचा फोटो ट्विट केला. ज्यात स्वतः रणजितसिंह निंबाळकर, माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे, अजितदादा गटाचे आमदार बबन शिंदे, माढ्याचे आमदार संजय शिंदेंसह समर्थक उपस्थित होते. तिकीट जाहीर होण्यााधीपासून रामराजे निंबाळकरासह मोहितेंकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना विरोध होता.

कालच्या बैठकीत धैर्यशील पाटील किंवा मग शेकापचे अनिकेत देशमुख या दोघांच्या नावावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय.
मात्र गिरीश महाजनांच्या मनधरणीनंतर मोहितेंची भूमिका काय असेल., याची प्रतीक्षा आहे.

सोलापुरात आमदार राम सातपुतेंना लोकसभेच्या तयारीच्या सूचना दिल्याचं भाजप सूत्रांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी इच्छूक शरद बनसोडेंनी आपल्यालाही फडणवीसांनी फोन केल्याचं सांगत फडणवीसांची भेट घेतली. त्याच्या काही वेळेत इच्छूक असलेल्या अमर साबळे देखील फडणवीसांच्या घरी पोहोचले.

उदयनराजेंची उमेदवारी भाजपनं जाहीर न केल्यानं त्यांच्या समर्थकांनी सातारच्या विश्रागृहावर भाजपला इशारा दिला. दुसऱ्या दिवशी उदयनराजेंनीही आपण संन्यास घेतलेला नाही म्हणत विधान केलं. नंतर भाजपचे गिरीश महाजन सातारच्या जलमहाल या उदयनराजेंच्या निवासस्थानी पोहोचले.