भोपाळ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नव्या व्यक्तीची निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषद घेतली. निरोपाच भाषण असतं, तसच शिवराज सिंह चौहान या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले. पण त्यांची दोन वक्तव्य राजकारणाची जाण-समज असणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. ‘मी स्वत:साठी काही मागण्यापेक्षा मरण पसंत करेन’ असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. छिंदवाडामधून निवडणूक लढणार का? यावर त्यांनी ‘मी स्वत:च्या बाबतीत कोणताही निर्णय घेत नाही’ असं उत्तर दिलं.
शिवराज सिंह चौहान यांनी नवीन मुख्यमंत्री मोहन यादव यांना शुभेच्छा दिल्या. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश विकास आणि प्रगतीची नवीन उंची गाठेल अशी अपेक्षा सुद्धा शिवराज यांनी व्यक्त केली. आज माझ्या मनात समाधानाची भावना आहे, असं शिवराज म्हणाले. मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक विजयामागे लाडली बहन योजना आहे, त्या बद्दलही ते बोलले.
शिवराज सिंह चौहान काय विसरु शकणार नाहीत?
पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्या दिवसाची आठवण शिवराज सिंह चौहान यांनी सांगितली. बाबू लाल गौर यांच्यानंतर शिवराज यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी संभाळली होती. समर्थक त्यांना प्रेमाने मामा हाक मारतात. जनता ज्या प्रेमाने मला ‘मामा’ म्हणते ते मी कधी विसरु शकत नाही. 2008 आणि 2013 मध्ये भाजपाच सरकार आलं, तेव्हा शिवराज सिंह चौहानच मुख्यमंत्री बनले.
यशाच कारण काय सांगितलं?
2018 च्या विधानसभा निवडणुकीत भले भाजपाच्या जागा कमी झाल्या पण मत जास्त मिळाली होती, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठ यश मिळालं. त्याच विश्लेषण करताना त्यांनी सांगितलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारच्या योजना, लाडली बहन योजना यामुळे हे यश मिळालं”
शिवराज सिंह यांनी कोणाचे आभार मानले?
“मुख्यमंत्रीपदावर असताना, माझ जनतेसोबत प्रेमाच नातं होतं. जो पर्यंत माझा श्वास चालू राहील, तो पर्यंत मी हे नातं तुटू देणार नाही” शिवराज यांनी केंद्रीय नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी मला काम आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली. शिवराज यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले.