भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या कामांमुळे भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली. पण भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नेतृत्वबदल करत मोहन यादव यांना मध्य प्रदेशच मुख्यमंत्री बनवलं. आता शिवराज सिंह चौहान यांना भाजपामध्ये कुठली नवीन जबाबदारी मिळणार? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत त्यांना काही ठिकाणी पाठवलं जाऊ शकत. शिवराज सिंह यांनी दक्षिणेकडच्या राज्यात जाण्याच निश्चित केलय. एकप्रकारे ते मध्य प्रदेशपासून दूर जाणार आहेत.
मध्य प्रदेशात मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “मंत्रिमंडळ स्थापनेसंबंधी माझ्याशी चर्चा झाली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मला जी भूमिका दिली जाईल, त्यासाठी मी काम करीन. मध्य प्रदेशात डॉक्टर मोहन यादव मुख्यमंत्री आहेत. ते सीएम आहेत. मी आमदार आहे. ते माझे नेते आहेत”
मोहन यादव यांच्याबद्दल काय म्हटलं?
“भाजपामध्ये कोणी छोटा-मोठा नसतं. माझी मनापासून हीच इच्छा आहे की, आम्ही मध्य प्रदेशात जी काम केली, बीमारु ते विकसित मध्य प्रदेश बनवलं. त्याला मोहन यादव अजून नव्या उंचीवर, समृद्धिकडे घेऊन जातील” असा विश्वास शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. “मोहन यादव पूर्ण सहकार्य करतील. माझ्यापेक्षा चांगलं काम करतील. ते मध्य प्रदेशला विकास आणि समृद्धिच्या मार्गावर घेऊन जातील. माझी जेपी नड्डा यांच्यासोबत चांगली चर्चा झाली” असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
‘भाऊ-बहिणीच प्रेम अमर आहे’
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ‘मी राज्यातही राहणार आणि केंद्रातही’. “तुम्ही एका मोठ्या मिशनसाठी काम करत असाल, तर पार्टी ठरवेल तुम्ही कुठे काम करायच. भाऊ-बहिणीच प्रेम अमर आहे. त्याचा कुठल्या पदाशी संबंध नाही. विकसित भारत संकल्प यात्रेत काही ठिकाणी जायला सांगितल जाऊ शकत” असं शिवराज सिंह म्हणाले.