मुंबई: भाजपने राज्यसभेसाठी (rajya sabha election) सातवा उमेदवार दिल्यानंतर महाविकास आघाडीनेही (maha vikas aghadi) जोरदार सेटिंग सुरू केली आहे. एक एक मत मिळावं म्हणून आघाडीने प्रयत्न सुरू केला आहेत. काहींना चर्चा करून समजावलं जात आहे. तर काहींना आश्वासनं देऊन आपलसं करून घेतलं जात आहे. मात्र, जे लोक ऐकायला तयार नाहीत, त्यांची समजूत काढण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी थेट त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशीच संपर्क साधायला सुरुवात केली आहे. राज्यातील समाजवादी पार्टीच्या (samajwadi party) नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आघाडीने आधी समाजवादी पार्टीच्या राज्यातील नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण सपाचे दोन्ही आमदार भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर आघाडीच्या नेत्यांनी थेट समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर चक्रे फिरली आणि अबू असीम आजमी यांना बॅकफूटवर यावं लागलं. भाजपपेक्षा आघाडी बरी. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आम्ही आघाडीला मतदान करणार आहोत, असं आजमी यांनी स्पष्ट केलं.
अबू असीम आजमी यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही माहिती दिली. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो. त्यावेळी मिलिंद नार्वेकर, अनिल परबही होते. माझ्या पत्राचं उत्तर पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर अजितदादांनी मला गाडीत बसवलं आणि सीएमकडे घेऊन गेले. तिथे गृहमंत्रीही होते. तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे तुमच्या मागण्यांकडे लक्ष गेलं नसेल. कुठे तरी हलगर्जीपणा झाला असेल. पण आता आपण सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. सर्वांची कामं होणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती आजमी यांनी दिली.
महाविकास आघाडीला आमचं समर्थन आहे. ऊर्दू अकादमी, मायनॉरिटी कमिशन, मौलाना आझाद आर्थिक महामंडळ याचे प्रश्न प्रलंबित आहेत. भिवंडीत तीन रस्त्यांची कामे तसेच पडली आहेत. मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणाचा मार्ग निकाली निघाला नाही. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यावर हे सर्व सोपं आहे. ते करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, असंही त्यांनी सांगितलं.
त्यानंतर मला अखिलेश यादव यांचा फोन आला. भाई चर्चा झालीय. तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा, असं अखिलेश यादव यांनी मला सांगितलं. त्यामुळे आम्ही आघाडीला पाठिंबा देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी दिलेलं आश्वासन चुनावी जुमला तर नाही ना? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर हा जर चुनावी जुमला असेल तरीही मी जाऊ कुठे? एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. भाजपपेक्षा तर हे चांगले आहेत. त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. अजित पवार एक वचनी आहेत. ते चुनावी जुमला करणार नाही, असंही ते म्हणाले.