मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. महाविकास आघाडीची मुंबईत तीन दिवस बैठक चालणार आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडीचे सर्वच नेते मुंबईत तळ ठोकून राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक होत असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसात काही आमदार आणि काही पक्षांचे नेते हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटून गेले. त्यामुळे या नेत्यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही? यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या बैठकीचे हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
महाविकास आघाडीची येत्या 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे. विद्यमान आमदारांची संख्या वगळून इतर जागांबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीत कुणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या बैठकीत काही जागांच्या अदलाबदलीवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी ही तडजोड करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राजकीय वातावरण बदललं आहे. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे नेते अत्यंत सावधपणे पावलं टाकणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणत्या जागांची अदलाबदली होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनच पक्षांनी आपआपसात जागा वाटप करून निडवणूक लढवली होती. छोट्या पक्षांना एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे यावेळी समाजवादी पार्टी, डाव्या पक्षांसह इतर घटक पक्षांना महाविकास आघाडीकडून जागा सोडल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आधी छोट्या पक्षांना किती जागा सोडायच्या याचा निर्णय करण्यात येईल. त्यानंतर ऊर्वरीत जागांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण चांगलंच बदललं आहे. अनेक छोट्या पक्षाचे नेते आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यात भाजपच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांचाही समावेश होता. बच्चू कडू यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या सर्वांना सोबत घ्यायचे की नाही? याची चर्चाही या बैठकीत होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सुद्धा ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.