महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत आज मोठा राडा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप खरेतर अंतिम टप्प्यात आहे. पण विदर्भातील जागांवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. मविआच्या जागावाटपाच्या आजच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्याकडून काही जागांवर दावा करण्यात आला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद उफाळला. जागावाटपाच्या तिढ्यावर सामंजस्याने चर्चा व्हावी, यासाठी बैठक पार पडत होती. पण या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मोठा वाद झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या वादानंतर ठाकरे गटाने टोकाची भूमिका घेतली. नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची जागावाटपवर बैठक होणार नाही, अशी थेट भूमिकाच ठाकरे गटाने घेतली. त्यामुळे या वादाची दखल काँग्रेसच्या हायकमांडला घ्यावी लागली. काँग्रेस हायकमांडने काँग्रेसचे ज्येष्ठ तथा शांत आणि संयमी असलेले नेते बाळासाहेब थोरात यांना तातडीने मुंबईत जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात आपला दौरा अर्थवट टाकून मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बाळासाहेब थोरात हे आपला नियोजित मतदारसंघाच्या दौऱ्यात आज व्यस्त होते. पण त्यांना दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांकडून तातडीने मुंबईकडे रवाना होण्याचे आदेश आले. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वादानंतर थोरात मुंबईकडे रवाना झाले. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच शांत आणि संयमी असलेल्या बाळासाहेब थोरात यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. मी नगर, नाशिक जिल्ह्यातील तिढा सोडवण्यासाठी आलो होतो. संजय राऊत यांचं वक्तव्य एवढं विशेष नाही. आम्हाला आमच्या जागांचा आग्रह करावाच लागेल. अनेक गोष्टी झाल्या आहेत. मात्र काही जागांवर तिघांचा आग्रह आहे. सामोपचाराने सगळे प्रश्न मिटतील, याचा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.
“ठाकरे गटाने नाना पटोले यांच्या विषयी केलेले वक्तव्य कुठेही दिसून आले नाही. केवळ मीडिया त्या बातम्या दिसल्या. याबाबत माहिती घेतली तर असं वक्तव्य कोणीही केलेलं नाही आणि हीच वस्तुस्थिती आहे”, असंदेखील बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. “जागांचा आग्रह धरणं हा आमचा अधिकार आहे. याबाबत केवळ आग्रही चर्चा होत असते. मात्र चर्चा करताना आम्ही जे बोललो त्यापेक्षा वेगळच मीडियात येत असतं”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.