महाविकास आघाडीच्या गोटात अभूतपूर्वी हालचाली घडत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची जागावाटपाबाबतची बैठक होणार नाही, अशी भूमिकाच ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यात किती टोकाचा वाद निर्माण झाला याचा प्रत्यय येतोय. या वादानंतर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्या वादानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुटेल इतकं ताणू नये, असं सूचक वक्तव्य केलं आहे. वादानंतर दोन्ही बाजूने आता सारवासारव झाली असून कोणताही वाद झाला नसल्याची प्रतिक्रिया आता देण्यात येत आहे. पण त्यादरम्यान आणखी महत्त्वाची घडामोड घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या बैठकीत काल झालेल्या बैठकीत वाद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी जागावाटपाच्या वादावरही चर्चा झाली. या चर्चेनंतर आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय निश्चित होतो? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत केवळ 10 जागांवरती तिढा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाविकास आघाडीत आत्तापर्यंत काँग्रेसच्या 103, राष्ट्रवादी 85 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 90 जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 278 जागांची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आहे. सध्या केवळ 10 जागांवर वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवरुन वाद सुरू आहे. शिवसेनेला विदर्भात पुरेशा जागा मिळत नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपात जो वाद झाला त्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रातील भिष्माचार्य (शरद पवार) या वादातून तोडगा काढतील. येत्या दोन दिवसात गोष्टी सुरळीत होतील. असे राजकारणात होत असते. प्रत्येक वाद हा झाला की उत्तर दिलेत पाहीजे असे नाही. असे काही नाही. दोन दिवसात चर्चा पूर्ण होऊन जागावाटप होईल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.