विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गट अखेर महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब झालं आहे. काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आघाडीच्या पराभवावरून मित्र पक्षांना जबाबदार धरलं होतं. त्यानंतर आज संजय राऊत यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर काँग्रेस मात्र बॅकफूटवर आली आहे. काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंच्या या निर्णयावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत हे नेते मोठे आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली असेल. तरीही आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. आपण एकत्र लढू अशी त्यांना विनंती करू. नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे. शरद पवारसाहेब आणि आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे. आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करू, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
इंडिया आघाडी मजबूत आहे. दिल्लीत इंडिया आघाडीला धक्का लागलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. कालच्या माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी म्हणालो की, नाना भाऊ, संजय राऊत आणि आम्ही त्या चर्चेत होतो. आम्ही चर्चेच्या गुऱ्हाळात 20 दिवस घालवले. आम्हाला प्लानिंग करायला हवं होतं. प्लानिंग नसल्यामुळे आम्हाला फिरायला वेळ मिळाला नाही. त्याचा अर्थ त्यामुळे आम्हाला झटका बसला, असं म्हटलं. पण माध्यमांनी चुकीचं दाखवलं. पराभवाला दोघंच जबाबदार आहे, अशी बातमी पेरली. ती चुकीची आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विधानसभेला एकत्र लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची हे तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील. किंवा एखादा पक्षही आपली भूमिका जाहीर करू शकतो. काँग्रेसनेही आपली तयारी सुरू केली आहे. काँग्रेस शेवटी राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. काँग्रेसने अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या आहेत, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.
स्थानिक नेतृत्व किंवा जिल्ह्याचं नेतृत्वच जिल्ह्यात काय करायचं ठरवतं. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणच्या नेत्यांवर सर्व सोडत असतो. स्थानिक नेते समविचारी पक्षांशी बसून चर्चा करत असतील, भूमिका ठरवत असतील तर आम्ही त्याला मान्यता देत असतो. काँग्रेसचे राज्याचे प्रमुख आता एकत्र बसून ठरवेल आणि तीच भूमिका अधिकृत राहील. तिन्ही पक्षाची भूमिका काय आहे, ते एकदा जाणून घेतील आणि त्यानुसार निर्णय घेतील, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय असू शकतो. आमच्या पक्षाने मात्र अजून भूमिका घेतलेली नाही. काँग्रेसची राज्यात ताकद आहे. काँग्रेस मजबुतीने लढू शकतो. त्यांनी काही निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं नाही. आम्ही विधानसभेत एकत्र काम केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसले असतील असं वाटत नाही. पण कोणी भूमिका घेतली असेल तर ती त्या पक्षाची भूमिका असू शकते, असंही त्यांनी म्हटलं.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे ही आमची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आमच्या पक्षश्रेष्ठींशी आम्ही बोलू आणि आमचे श्रेष्ठी निर्णय घेतील. पण संजय राऊत यांनी या गोष्टी मीडियात बोलण्यापेक्षा चर्चेच्या माध्यामातून बोललं पाहिजे. त्यांच्या पक्षाचं व्यक्तिगत मत ते मांडतात. आमच्या पक्षाचं मत आम्ही तुम्हाला सांगू, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
आपल्याला संधी मिळाली पाहिजे, असं आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मुंबईत आमच्या जागा निवडून आल्या असत्या. लोकसभेला मी तिकीट मागितलं कुठे आणि दिलं कुठे. विधानसभेत जागा मिळाल्या नाही. पण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही निवडून आणलं आहे. त्यासाठी मेहनत घेतली आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं नेत्यांनी ऐकायचं असतं. त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे. मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. पक्ष श्रेष्ठी निर्णय घेईल, असंही त्या म्हणाल्या.