बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती, अखेर आज ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने 17 उमदेवार जाहीर केले आहेत. यात मुंबईतून कोणाला उमेदवारी मिळणार? याची उत्सुक्ता होती. अखेर ती नाव समोर आली आहेत. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाचा सामना थेट भाजपा बरोबर होणार आहे. उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत आहे. मुंबईत उद्धव ठाकरे गटाची ताकद जास्त आहे. त्यामुळे मुंबईत जास्त जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला मुंबईत एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची. इथले विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. उर्वरित पाच जागांवर भाजपा आपले उमेदवार उतरवू शकतो. भाजपाने मुंबईतील काही जागांवर आपले उमेदवार सुद्धा जाहीर केले आहेत.
ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. संजय दिना पाटील हे माजी खासदार आहेत. 2009 साली किरीट सोमय्या यांना पराभूत करुन ते लोकसभेमध्ये गेले होते. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी त्यांना पराभूत केलं. संजय दिना पाटील पहिल्यांदा खासदार झाले, तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता ते उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. अरविंद सावंत सर्वात पहिल्यांदा 2014 साली लोकसभेवर निवडून गेले. 2014 आणि 2019 दोन्हीवेळा अरविंद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. आता तेच मिलिंद देवरा शिवसेना शिंदे गटात असून ते राज्यसभेवर खासदार आहेत.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
मुंबईतील अन्य उमेदवार कोण?
अरविंद सावंत दोन्हीवेळा निवडून आले, तेव्हा मोदी लाट होती. पण आता अरविंद सावंत यांच्यासमोर आव्हान असेल. दक्षिण मुंबईतून भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे तसच मनसे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास ही जागा त्यांना मिळू शकते. वायव्य मुंबईतून अमोल किर्तिकर, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.