“वसंतराव देशमुख म्हणे काँग्रेसचे. यांच्या गळ्यात पट्टा भाजपचा, त्याहीपेक्षा देशमुखांच्या गळ्यात विखेंचा पट्टा. वसंत देशमुख खालच्या पातळीवर बोलले. त्यांच्या कानपट्टीत हानण्याऐवजी तुम्ही पुढच्या भाषणाला जास्त वेळ देवू असं म्हणता” अशा शब्दात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. संगमनेरमधील धांदरफळमध्ये भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद झाला. हिंसाचार झाला. “मला काही कनोली-मनोली-कनकापुर असा दौरा नाही. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे” असा विखे पाटील यांना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला.
“संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघ राज्याचं केंद्र बनला आहे. आता सगळे मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. एखाद्या गावाला सभा करायची आणि गावातली माणसं पंधरा. कालची सभा प्रचंड झाली. प्रवरा कारखान्याचे कर्मचारी आणि बाहेरून लोक आले. धांदरफळ मध्ये जे वक्तव्य केलं, ते सगळ्यांनी पाहिलं. ते म्हणतात हा वसंत देशमुख काँग्रेसचा आणि गळ्यात पट्टा भाजपचा तो पट्टा विखेंचा” असं बाळासाहेब थोरात बोलले. “ज्यावेळी हे वक्तव्य झाले, त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होते, हसत होते. मग तुम्ही जबाबदार कसे नाहीत? एवढं वक्तव्य केलं, त्यानंतर पुढच्या सभेत जास्त वेळ देऊ अस सुजय बोलले. कानफडात देण्याऐवजी वेळ देऊ बोलले” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
‘तो महिलांचा अवतार पाहून पळून गेला’
“पंधरा मिनिटात लोक आले म्हणतात. आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. आमच्याकडे वैचारिक भाषण केली जातात. सुजय विखेला विचारायला महिला गेल्या आणि तो महिलांचा अवतार पाहून पळून गेला. अकोले समृध्दी मार्गे शिर्डीत पोहचले आणि कार्यकर्ते मागे राहिले. तुम्ही जर मर्द होता, तर मग पळाला कशाला?” असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.
‘आमच्या तालुक्यात नादाला लागू नये’
“कालच्या सभेत त्यांना अश्रू आले. मात्र जया रडली नाही लढली. स्वातंत्र्य सेनानीच्या घरातली मुलगी आहे. आमच्या तालुक्यात नादाला लागू नये. लागल्यावर काय होत ते पाहिलं. ही तर फक्त झलक होती, ते आरोप करतात आमच्याकडे विकास झालेला नाही. दोन्ही तालुक्याच्या जनतेला आवाहन करतो तीच आता आपली न्यायाधीश. एकदा तुलना होऊन द्या, एकदा कुठे दहशत आहे आणि दडपशाही, आणि मग जनता निर्णय देईल मतांच्या रूपाने. विकास कोणी केला कोणी नाही? जनतेशी संवाद कसा आहे कोणाचा, हे सगळं दोन्ही तालुक्यातील जनतेसमोर मांडा आणि तुलना करा” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.